कोल्हापुरातील जनतेने जसा टोल बंद पाडला त्याचप्रमाणे राज्यातील टोल संस्कृती हद्दपार करावी, असे मत कॉ.गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले. आराम बस वाहतूकदारांचे सोनतळी येथे आयोजित केलेल्या शिबीरउद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. पानसरे म्हणाले की, वाहतूकदार हे भारतरूपी शरीराच्या रक्तवाहिन्या आहेत. रक्तवाहिन्या थांबल्या तर शरीर जसे निष्प्राण होईल तसे वाहतूक थांबली तर देशसुध्दा निष्प्राण होऊ शकतो. वाहतूकदार हे देशाचे अत्यावश्यक व अविभाज्य घटक आहेत. तरीही सरकार त्यांच्यावर अन्यायी टोलरूपी कर लादत आहे. या दुहेरी व अन्यायी करामुळे वाहतूकदार उद्ध्वस्त होत चालला आहे. हे वाहतूकदारांना तसेच देशालाही घातक आहे. टोल टॅक्स हा वाहतूकदारांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने याबाबत आपण निकाराने या विरोधात लढा दिला पाहिजे.     आराम बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, गेल्या ५० वर्षांत ११५ पटीने महाराष्ट्रातील वाहनांची संख्या वाढली, पण रस्त्यांची रूंदी मात्र ९ पटीनेच वाढली. तसेच गेल्या पाच वर्षांत रोड टॅक्सची रक्कम तिपटीने वाढलेली आहे. मग वाहतूकदारांकडून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घेतलेला रोडटॅक्स गेला कुठे ? याऊलट नवीन टोलरूपी जीझिया कर आता जवळ-जवळ शहरांतर्गत रस्त्यांसह प्रत्येक रस्त्याला सरकारने लावलेला आहे. मोटारवाहन कायदा १९८८ च्या कलम ९३ नुसार सर्व एजंटांना परिवहन खात्याने परवाने देणे आवश्यक आहे. वारंवार मागणी करूनही हे परवाने मिळत नाहीत. मोटारवाहन धारकांवर शासनाकडून होणाऱ्या अशाप्रकारच्या अनेक अन्यायाविरोधात आपण संघटितपणे लढा उभारण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला.     शिबिरामध्ये जादूटोणा व बुवाबाजी याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य अनिल चव्हाण यांनी केले. आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा रचून लिपिक सागर शिंदे व पंटर यांना पकडून देणाऱ्या शोएब मुजावर आणि तहसीलदार कार्यालयातील तलाठी वैजयंती अब्दागिरे यांना पकडून देणारे दिलदार मुजावर या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार पानसरे यांच्याहस्ते करण्यात आला. पानसरे यांनी दोंन्ही कार्यकर्त्यांनी केलेल्या धाडसी कृत्याबद्दल प्रत्येकी एक हजार रूपयांचे बक्षीस दिले.