सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या इमारत सुशोभीकरण तथा दुरूस्ती कामात १२ लाख २६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी शिक्षण मंडळाचे तत्कालीन सभापती सुनील रसाळे व प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्यासह तिघा कर्मचा-यांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी होऊन ही फौजदारी कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पालिका शिक्षण मंडळाचे सभापती सुनील नागनाथराव रसाळे व तत्कालीन प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे, तसेच लिपीक इब्राहिम हुल्याळीकर, हिशोब तपासनीस जगदीश काटेवाले व अभियंता श्रीरंग नादरगी यांची नावे या अपहाराच्या गुन्ह्य़ात आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. २८ ऑगस्ट २०११ ते ३० मार्च २०१२ या कालावधीत हा अपहाराचा प्रकार घडला.
नव्या पेठेत पालिका शिक्षण मंडळाची जुनी ऐतिहासिक इमारत असून ‘हेरिटेज’ म्हणून इमारतीचे संरक्षण करण्याचा प्रस्ताव होता. तसेच, या इमारतीच्या सुशोभीकरण व दुरूस्तीच्या कामाला स्थानिक भुईकोट किल्ल्यामुळे पुरातत्त्व वास्तू संरक्षण कायद्याचीही आडकाठी होती. परंतु तरीदेखील या इमारतीच्या सुशोभीकरणाचे व दुरूस्तीचे काम पूर्ण केले गेले. तथापि, या कामात गुणवत्ता साधली न जाता निकृष्ट दर्जा दिसून आल्यामुळे त्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान, पालिका आयुक्त गुडेवार यांच्याकडे याबाबतची तक्रार येताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शिक्षण मंडळाचे विद्यमान सभापती प्रा. व्यंकटेश कटके यांनीही याप्रकरणाच्या चौकशीसाठी पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी चौकशी केली असता त्यात अपहाराचा प्रकार उघड झाला. दुरूस्तीची कामे करताना संबंधितांनी पालिका प्रशासनाची तसेच इतर संबंधितांची परवानगी घेतली नाही. अधिकारपदाचा गैरवापर केला. कागदपत्रात खाडाखोड करून स्वत:चे हित साधल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यात शासनाची व शिक्षण मंडळाची फसवणूक झाल्यामुळे अखेर तत्कालीन सभापती रसाळे व प्रशासनाधिकारी सोनवणे यांच्यासह अन्य तिघांविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली.