गंगाखेड तालुक्यातील पांगरी व कोद्री येथील भारत निर्माण योजनेत अपहार करणाऱ्या महिला अध्यक्षासह सचिवावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले.
भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाची कामे करण्यासाठी सरकारकडून कोद्री येथे १० लाख २६ हजार ४५२ रुपये निधी मंजूर केला होता. परंतु निधीचा पाणीपुरवठय़ासाठी उपयोग न करता अपहार करण्यात आला. तब्बल ९ लाख ७१ हजार ४२१ रुपयांचा अपहार झाला. या बाबत जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे अधिकारी जगन्नाथ निमकर्डे यांच्या तक्रारीवरून योजनेच्या अध्यक्षा छाया गोिवद लटपटे व सचिव महारुद्र तुकाराम बिडगर यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल झाला. असाच अपहार याच तालुक्यातील पांगरी येथेही झाला. पांगरी पाणीपुरवठा योजनेत ५ लाख ३५ हजार ७९२ रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार निमकर्डे यांनीच िपपळदरी पोलिसांत दिली. त्यावरून पाणीयोजनेच्या अध्यक्षा सुलोचना वावरे व सचिव संजीव वावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.