न्यायाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी न्यायाधीश, वकील व या व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या व्यवस्थेतील प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून काम करावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम.एन. गिलाणी यांनी केले.
येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्या.एस.टी. बारणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी टी.ए. संधू आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य आशीष देशमुख, घाटंजी वकील संघाचे अध्यक्ष विजय भुरे उपस्थित होते.
न्यायव्यवस्था प्रत्येकाला न्याय देण्यासाठी कार्य करते. असे असले तरी नागरिकांनीही आपल्या अधिकाराबाबत जागरूक असले पाहिजे. नागरिकांच्या हक्कासाठी न्यायालय असल्याने हक्काचे उल्लंघन होत असल्यास न्यायालयात धाव घ्यावी, मात्र वैयक्तिक वादातून निर्माण झालेल्या प्रकरणात निर्दोष व्यक्तींना नाहक न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवू नये, असे न्या. गिलाणी म्हणाले.
यावेळी न्या. बारणे यांनी ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात न्यायालय असावे, अशी भूमिका आहे. न्यायव्यवस्था आधुनिक होत आहे. खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. न्यायालयाच्यावतीने दिले जाणारे निकाल समाजावर परिणाम करणारे असतात. त्यामुळे या व्यवस्थेतील प्रत्येकाने सचोटीने काम करावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी अ‍ॅॅड. आशीष देशमुख, अ‍ॅॅड. विजय भुरे यांनीही विचार मांडले.
आभार न्यायाधीश टी.ए. संधू यांनी मानले. कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे उपप्रबंधक ए.जे. रोही, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा, उपाध्यक्ष अकबर तंवर, माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, सभापती परेश कारीया यांच्यासह न्यायाधीश व वकील तसेच नागरिक उपस्थित होते.