‘आयटक’च्या नेतृत्वाखाली राज्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याशी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याने मागण्या मान्य होण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आरोग्य मंत्र्यांबरोबरच्या चर्चेत आशा व गटप्रवर्तकांना दरमहा निश्चित मानधन देण्याचा मुद्दा मांडला गेला. आरोग्यमंत्र्यांनी आशा कर्मचाऱ्यांना दरमहा त्यांच्या कामाच्या मोबदल्याइतका स्वतंत्र प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगून हा प्रस्ताव अर्थखात्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची हमीही त्यांनी दिली. तसेच आशा कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येत असलेला निरनिराळ्या कामाचा मोबदला दुप्पट करण्याचे आणि जननी सुरक्षा योजनेच्या लाभाबाबत ‘एपीएल’ आणि ‘बीपीएल’ असा भेदभाव रद्द करून सरसकट लाभ देण्याचेही त्यांनी मान्य केले. आशा कर्मचाऱ्यांचा मासिक बैठक भत्ता १५० वरून ३०० रुपये करण्याचा आणि यापुडे आशा कर्मचाऱ्यांना कोणतेही काम विनामोबदला दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास सांगितले.
याशिवाय अर्धवेळ स्त्री परिचरांच्या मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले. या सर्व निर्मयाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ दिवसांच्या आत अधिसूचना काढण्याची मागणी शिष्टमंडळाने केली असता लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आरोग्य मंत्र्यांनी मान्य केले. आशा व गटप्रवर्तकांना दरमहा १० हजार रूपये वेतन द्यावे, अंशकालीन पारिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करावे, त्यांना दरमहा १८०० रूपये देण्याच्या अजित पवार यांच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, पावसाळी कामात छत्री, रेनकोट आदी साहित्य देण्यात यावे आदी मागण्या शिष्टमंडळाच्या वतीने मांडण्यात आल्या.
चर्चेत महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचे (आयटक) महाराष्ट्र अध्यक्ष नाशिकचे कॉ. राजू देसले, सरचिटणीस नामदेव चव्हाण, ममता वसावे आदींनी सहभाग घेतला.