भविष्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड, तर जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ निर्माण करण्याचे संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळ विकासाला पर्यायाने युवकांना रोजगाराच्या अनेक संधी विमानतळ व्यवस्थापनात मिळणार असल्याचे प्रतिपादन मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मनोज राजीमवाले यांनी केले आहे.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विद्याशाखेतर्फे ‘विमानतळ व्यवस्थापन व मनुष्यबळ विकासाची संधी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहताना भारताचे दळणवळण अधिकाधिक वेगाने होत आहे. रस्ते, जलवाहतूक, भुयारी वाहतुकीसह हवाई वाहतूकही तितकीच महतत्त्वाची ठरू लागली आहे. ग्राहकाभिमुख झालेली ही विमानतळ व्यवस्थापन सेवा कारकिर्दीच्या दृष्टीने नवे क्षितिज असल्याचेही राजीमवाले यांनी नमूद केले. विमानतळ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असते. ग्राहकांच्या सामानाची व्यवस्था पाहण्यासह नियमांविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करणे, तांत्रिक समस्या तात्काळ सोडविणे यांसारख्या लहान-मोठय़ा १८४ प्रकारच्या सेवा-सुविधा विमानतळ व्यवस्थापनाला उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे युवा पिढीने या क्षेत्राकडे कारकीर्द म्हणून पाहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. मनुष्यबळ विकासचे व्यवस्थापक प्रशांत सावंत यांनी मनुष्यबळाच्या गरजेविषयी सादरीकरण केले.
प्रारंभी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेंद्र वडनेरे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक डॉ. रामचंद्र तिवारी यांनी संगणक विषयक अभ्यासक्रमांची तसेच ‘बी. एस्सी इंडस्ट्रियल सायन्स’ (कमवा व शिका) या नवीन अभ्यासक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन वरिष्ठ सल्लागार श्रीधर व्यवहारे यांनी केले. या आकर्षक क्षेत्राची सखोल माहिती होण्याच्या दृष्टीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. एन. आर. शिंदे, सहयोग व विशेष उपक्रम केंद्राच्या संचालिका डॉ. अनुराधा देशमुख यांसह विविध विद्याशाखांचे सल्लागार, संचालक यावेळी उपस्थित होते. विनी काळे, सोनाली पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. साहाय्यक प्रा. प्रमोद खंदारे यांनी आभार मानले.