मुंबई विद्यापीठाची सिंधू स्वाध्याय संस्था आणि युनिव्हर्सटिी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील ओशिएन इन्स्टिटय़ूट यांच्यात सागरी विज्ञान क्षेत्रात संशोधनाला चालना मिळावी यासाठी महत्त्वाकांक्षी वाटचाल करण्यात येत आहे. सागरी विज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेले बदल तसेच या क्षेत्रात निर्माण होऊ पाहणाऱ्या रोजगाराच्या संधी यासाठी मुंबई विद्यापीठाने हा एक अभिनव प्रयोग सुरू केला आहे. ७२० किमी.चा सागरी किनारा लाभलेल्या या भूभागात रोजगाराच्या अनेक संधी असून या संधींची माहिती तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हा प्रकल्प साकारला आहे.
सध्याच्या सागरी विज्ञान अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करून त्यात अभिनव तंत्रज्ञानाचा, प्रगत शैक्षणिक धोरणांचा आणि प्रगत ज्ञानशाखांचा अवलंब करून संशोधनाला चालना मिळावी यासाठी आज समन्वय बठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बठकीला  प्रीमियर, मिनिस्टर फॉर स्टेट डेव्हलपमेंट, सायन्स, गव्हर्नमेंट ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कॉलीन बारनेट आणि  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, कुलसचिव डॉ. एम. ए. खान, सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक प्रा. विनायक दळवी, डॉ.बी. एल. जाधव आणि या संस्थेशी निगडित असणारे प्राध्यापक आणि संशोधक यांच्यात समन्वय बठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बारनेट म्हणाले की, सागरी विज्ञान क्षेत्रात संशोधन करू पाहणाऱ्यांनाही एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. दोन्ही देशांतील या संस्थांच्या भागीदारीतून एक मोठे क्षेत्र तयार होणार असून याचा फायदा नक्कीच दोन्ही सस्थांना होणार आहे. तर तावडे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने सुरू केलेला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अनुंषगाने हे एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे.