* सगेसोयरे, मित्रांकडे बेघरांचा आश्रय
* भाडय़ाच्या घरासाठीही प्रयत्न
पालिकेने कारवाईला सुरुवात केल्याने वरळीतील कॅम्पा कोला वसाहतीतील रहिवाशांचा विरोध आता पूर्णपणे मावळला असून घरांमधील पाणी आणि विजेच्या जोडण्या कापण्यास सुरुवात झाल्यानंतर घरांना अवकळा येऊ लागली आहे. आता येथून जाण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आलेल्या रहिवाशांनी सामान इतरत्र हलवण्यास सुरुवात केल्यामुळे हा परिसर भकास दिसू लागला आहे.
महापालिकेने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्याची तयारी सुरू केल्यापासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या रहिवाशांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांनी ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नंतर तुमच्याबाबत सहानुभूतीने विचार केला जाईल’, अशी भूमिका घेतली. यानंतर सोमवारी या रहिवाशांनी त्यांचा हट्ट सोडला व पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. कर्मचाऱ्यांनी सात इमारतींमधील बेकायदा घरांतील पाणी, वीज आणि गॅसचे कनेक्शन्स तोडण्यास सुरुवात केली. मंगळवारीही महापालिका उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू राहिली. सकाळी ११ वाजता पोलीस, तर त्यानंतर १५ मिनिटांनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या परिसरात पोहचले. जी वॉर्ड दक्षिणचे अधिकारी केशव उबाळे हे यावेळी हजर होते. प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या सहा पथकांनी एका इमारतीतील नळाचे कनेक्शन्स, प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच पथकांनी विजेच्या जोडण्या, तर प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांच्या आणखी पाच पथकांनी गॅस कनेक्शन्स एकाचवेळी तोडण्यास सुरुवात केली. हताश झालेले रहिवासी या कारवाईला मुळीच विरोध करताना दिसत नव्हते.
आता काहीच होऊ शकत नाही, याची पुरेपूर कल्पना आल्यामुळे ज्यांच्या घरांमध्ये ही कारवाई होणार होती, त्यांनी कालपासूनच त्यांची घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती. आज अनेक रहिवासी घरातील सामान बांधून ते दुसरीकडे हलवत होते. बहुतेकजणांनी नातेवाईक, जवळचे मित्र किंवा इतरत्र घेऊन ठेवलेल्या जादा फ्लॅटमध्ये हे सामान हलवले. काहीजणांना मात्र अशी काहीच सोय नसल्यामुळे ते काळजीत होते. सामानाचे नुकसान होऊ नये यासाठी उद्योजक असलेले अमरचंद राठी यांच्यासारख्या काही रहिवाशांनी स्वत:च्या घराच्या आतील भिंती तोडलेल्या दिसत होत्या.

या कारवाईचा खर्च वसूल करण्यासाठी प्रत्येक सोसायटीला नोटीस देण्यात आली आहे. कारवाईसाठी किती खर्च येणार याचा हिशेब काढून त्यानुसार ही रक्कम वसूल केली जाईल. ज्या लोकांची घराच्या किल्ल्या जमा करण्याची तयारी आहे त्यांनी जी वॉर्ड कार्यालयात जाऊन किल्ल्या जमा कराव्यात.
आनंद वाघ्राळकर,
महापालिका उपायुक्त

आम्ही सध्यापुरते आमच्या काकांच्या घरी सामान हलवत आहोत. कँपा कोलातील काहीजण त्यांच्या जादा फ्लॅटमध्ये गेले आहेत, तर काहींनी भाडय़ाने घर घेतले आहे. पण या भागात घरांचे भाडे ६० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे. आम्हाला एवढे भाडे कसे परवडणार? गेल्या अनेक दिवसांपासून डोक्यावर सतत अनिश्चिततेची टांगती तलवार असल्यामुळे मी नोकरीही सोडून दिली.
विनित राठी,
रहिवासी