नागपूरच्या डागा रुग्णालयात जिल्हा रुग्णालय प्रस्तावित असून ब्रह्मपुरीतील रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर विभागातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. आशिष देशमुख, समीर मेघे, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अस्लम शेख आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. नागपूरच्या डागा रुग्णालयात शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय प्रस्तावित असून ब्रह्मपुरीतील रुग्णालयाची क्षमता ५० वरून शंभर केली जाणार आहे. मेयो व डागा या रुग्णालयात रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मागील दहा वर्षांपासून दिले जात असून मेयो रुग्णालयात एमआरआय यंत्र केव्हा बसविणार, असा सवाल या भागाचे आमदार विकास कुंभारे यांनी केला. ग्रामीण भागात बधिरीकरण तसेच भौतिकपोचार तज्ज्ञच उपलब्ध नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्य़ांमध्ये प्राथमक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावरील ३२३ रुग्णालये आहेत. त्यात महाराष्ट्र आरोग्य वैद्यकीय सेवा (गट अ ६६००) या संवर्गात एकूण २४८ पदे असून त्यापैकी ८८ पदे भरलेली आहेत. १६० पदे रिक्त आहेत. याच संवर्गात (गट अ ५४००) एकूण १०३८ पदे मंजूर असून ८६३ पदे भरलेली आहेत व १७५ पदे रिक्त आहेत. याच संवर्गातील रिक्त पदांमधील सरळसेवेच्या कोटय़ातील जिल्हा चिकित्सक संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, विशेषज्ञ व सामान्य राज्य सेवा संवर्ग, अशी एकूण २७३ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी मागणीपत्रे देण्यात आली आहेत. पदोन्नतीची पदे भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकी होऊन ५५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश झाले आहेत. त्यापैकी २७ अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. (ग्रेड पे ५४००) या संवर्गातील पदे २०१४ मध्ये स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्यासाठी एकूण १८८१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. नागपूर विभागात १८३ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून त्यापैकी १६७ उमेदवार हजर झाले. आदिवासी व नक्षलवादग्रस्त भागातील सर्व पदे भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, काही उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याने पदे रिक्त राहिली. सध्याची रिक्त पदे स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. रिक्त पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या आणि अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवली जाते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमार्फत प्राथमिक व दुय्यम पातळीवरील आरोग्यसेवा तर वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे टर्शअरी पातळीवरील सेवा दिली जाते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांना टर्शअरी पातळीवरील सेवा देणे आवश्यक असल्यास वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्यासाठी संदíभत केले जाते, असे मंत्र्यांनी सांगितले.