गोंदिया पालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर मुहूर्त सापडला आहे. यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तीनदा तारखा फिसकटल्या, परंतु आता ८ जानेवारीपासून शहरात बुलडोजर चालणार आहे, असे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त ठरला असला तरी अजूनही तारीख कायम राहणार का, याविषयी शंकाच आहे. शहरात ५० टक्के भूभागावर गोंदियाकरांनी अतिक्रमण केले आहे. शहरातील मुख्य रस्ते अरुंद झाले. बाजार परिसरातील रस्ते दिसेनासे झाले, तर गावाजवळील मामा तलावांचा आकारही लहान होत चालला आहे. इमारतीचे बांधकाम पालिकेच्या हद्दीत सांडपाण्याच्या नाल्यांवरून होत असल्याने नाल्या तुंबलेल्या आहेत. यामुळे पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा संकल्प घेतला आहे.
आता ८ जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी १७ डिसेंबर, २५ डिसेंबर व २८ डिसेंबर अशा मोहिमेच्या तारखा पुढे पुढे सरकत गेल्या. कधी पोलिसांचा तर कधी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अभाव, अशा एक ना अनेक कारणांनी ही मोहिम फुसका बार ठरली. २९, ३० व ३१ डिसेंबरला पालिकेचे सर्व विभागप्रमुख अमरावती येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेले होते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नवीन वर्षांत जानेवारीत ही मोहीम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. याअंतर्गत मोहिमेच्या नियोजनाचा आराखडा तयार झाला आहे. या मोहिमेला स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केली आहे.