शहरात सिहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहिमांना वेग आला आहे. नाशिकमध्ये सुमारे महिनाभरापासून ही मोहीम सुरू आहे, तर नांदगावमध्ये नुकतीच सुरुवात झाली. सटाणा पालिकेनेही अतिक्रमण तसेच धोकादायक इमारतींना इशारा दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे मात्र यासंदर्भात कोणतीही हालचाल नाही. केवळ ठरावीक कालावधीपुरतीच ही मोहीम न राबविता कायमस्वरूपी ती राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिंहस्थामुळे नाशिकमध्ये अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त असल्याने महापालिकेने धडाक्याने मोहीम सुरू केली आहे. मुंबई नाका परिसर, गंगापूररोड, नाशिकरोड, पंचवटी याप्रमाणे एकेका भागातील अतिक्रमण हटविण्यात येत असले, तरी अतिक्रमणधारक पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या मोहिमेत पालिकेकडून दुजाभाव होत असल्याचा आरोपही करण्यात येत असून, काही बडय़ा हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून गंगापूर रस्त्यावर एसटी कॉलनी परिसरात व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५४ टपऱ्या नुकत्याच हटविण्यात आल्या. ही मोहीम यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे सांगण्यात येत असले, तरी मेनरोडवर पंधरवडय़ापूर्वी जुन्या पालिका इमारतीजवळील रस्त्यावरच ठाण मांडणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी पुन्हा त्याच विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. हे अतिक्रमण अद्यापही कायम असून, पालिकेने त्यांना अभय दिले की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
नाशिकमध्ये ही स्थिती असताना नांदगाव शहरातही बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम यापुढे कायम ठेवण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिली. नांदगावमधील विविध चौकांमधील वार्ताफलकांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार नगरपालिका ते रेल्वेगेट परिसरात मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांचे हातगाडे ताब्यात घेण्यात आले. काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर माल विक्रीसाठी ठेवला होता. पालिकेचे कर्मचारी येत असल्याचे दिसल्यावर त्यांनी माल उचलून दुकानात ठेवला. लोखंडी पलंग तसेच राहिल्याने ते कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. गांधी चौकातील एका हॉटेलने पत्र्याचे छतच उभे केले होते. त्याने स्वत:हून छत काढून घेतले. किरकोळ विक्रेत्यांनी स्वत:हून आपला बाडबिस्तरा आवरून घेतला. परंतु पथक पुढे जाताच पुन्हा त्यांनी आपली दुकाने थाटली. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असला, तरी ही मोहीम यापुढे आठवडय़ातून दोन दिवस सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर सटाणा पालिकेनेही शहरातील धोकादायक इमारती आणि अतिक्रमण केलेल्यांना इशारा दिला आहे. ज्या इमारतींची स्थिती योग्य नाही, अशा इमारती पावसाळ्यात पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मालकांनी अशा इमारती स्वत:हून पाडून टाकाव्यात, अन्यथा पावसाळ्यात अशा इमारती पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास पालिकेची जबाबदारी राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अतिक्रमण करणाऱ्यांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील पालिका अतिक्रमणाविरुद्ध आक्रमक झाल्या असताना इगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये मात्र अतिक्रमणांना उधाण आले आहे. घोटीतील मुख्य बाजारपेठेत तर अतिक्रमणामुळे कायम वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांनाही नाकीनऊ येत आहेत. या बाजारपेठेतील अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवाशांचे अधिक हाल होत असून वारंवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.