भारत सरकारचा उपक्रम असलेल्या न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे नुकतेच मुंबईत सेंट तेरेसा हायस्कूल येथे ‘ऊर्जेचा अक्षय वापर आणि अक्षय स्रोत’ या विषयावर एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऊर्जेचे महत्त्व आणि आण्विक ऊर्जेबाबतचे गैरसमज दूर करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
स्पर्धेत लविना पावूरवितील आणि साक्षी बी. रावरिया यांना अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेत १४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना आण्विक ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या माहिती साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मारिया यांनी सांगितले, या चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कागदावर उतरविल्या आहेत. विद्यार्थ्यांनी चित्रांमधून ऊर्जेचे महत्त्व सांगितले आहे. आण्विक उर्जेपासून करण्यात येणारी वीजनिर्मिती ही पर्यावरणास हानीकारक नाही, हेही त्यांच्या चित्रांमधून त्यांनी दाखविले आहे.
ऊर्जेच्या वापराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे आणि आण्विक ऊर्जेबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येणार आहे.