शिक्षण हे निरंतर असावे, शिक्षणाच्या निरंतर प्रक्रियेने व्यक्ती सर्वदृष्टय़ा समृद्ध होऊन आयुष्यात व समाजात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकते, असे उद्गार तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी काढले.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘स्थापत्त्य अभियांत्रिकी सहाय्यक’ पदावर पदोन्नतीकरता पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या ७० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पाच महिने म्हणजे ८ सप्टेंबपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य दीपक कुळकर्णी यांनी संस्थेतील प्रशिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. १९१४साली अस्तित्वात आलेल्या या संस्थेस यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शंभराव्या वर्षांत या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रशिक्षणार्थी आणि संस्था या दोघांकरता गौरवाची बाब असल्याचे कुळकर्णी म्हणाले.
उद्घाटन सोहळ्यास अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग व प्रशासक आर.के. ढवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतन सारख्या अग्रगण्य संस्थेत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची अपूर्व संधी ही विभागाच्या कठीण प्रयत्नातून मिळाली असून सर्वानी या संधीचे सोने करावे, असे त्यांनी सुचवले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. वानखडे, स्थापत्त्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी वानखडे यांचीही भाषणे झाली. प्रशिक्षणाचे समन्वयक विवेक धाईत यांनी प्रास्ताविक केले. मा.का. पंचवटे यांनी आभार मानले. संचालन रा.मो. वाळके यांनी केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.एन. टापरे यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थीच्यावतीने प्रेमलाल गौतम यांनी प्रशिक्षणादरम्यान असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. अ.वा. पावडे, डॉ. संजय इंगोले, रोहित रामटेके, अनंत भैसवार, पी.टी. खोब्रागडे, भूषण अंबादे, राजेंद्र देशमुख, साहेबराव बन्सोड आणि रमेश बावणे आदींचे यावेळी सहकार्य लाभले.