श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निर्घृण खुनानंतर शवविच्छेदनाचा अहवाल नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मात्र अद्याप खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही.
अभियांत्रिकी महाविद्यालयात दुस-या वर्षांत शिकणा-या एकनाथ अंकुश पोटरे (वय १९) या विद्यार्थ्यांचा गुरुवारी रेल्वेच्या रुळावर बांधून निर्घृण खून करण्यात आला. काष्टी येथील या घटनेने अभियांत्रिकी महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील हा विद्यार्थी अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील होता. शांत स्वभावाचा व आज्ञाधारक विद्यार्थी हीच त्याची ओळख होती. एकनाथ हा बुधवारीच गावाकडे येऊन फीचे ३५ हजार रुपये घेऊन गेला होता. वडिलांकडे पैसे कमी असल्याने चुलत्यांकडून त्याने काही पैसे घेतले होते. त्यानंतर दुस-याच दिवशी त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
एकनाथ याच्या मृतदेहाचे श्रीगोंदे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ते करणारे वैद्यकीय अधिकारी बोंद्रे यांनी सांगितले, की मृतदेहाचे तीन तुकडे झाले होते, मात्र एक हात, एक पाय व पोटाचा भाग गायब होता. त्याच्या गळय़ाला नायलॉनच्या दोरीचे तब्बल १७ वेढे होते, ते आम्ही सोडले. त्यानंतर उजव्या हाताला जाड दोरखंड बांधलेला होता. आम्ही शवविच्छेदन केले, मात्र मृतदेहाचा व्हिसेराच उपलब्ध नसल्याने खुनाचे नेमके कारण शोधणे अवघड आहे.
मृत एकनाथचे चुलते आज कर्जतहून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र मीटिंगचे कारण देऊन तपासी अधिका-याने त्यांना सायंकाळी येण्यास सांगितले.