देशात कृषी, पर्यावरण, अर्थ, माहिती व तंत्रज्ञान, बायो, नॅनो तंत्रज्ञान या क्षेत्रात अजूनही भरपूर संधी आहे. अभियंते व शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात उल्लेखनीय काम करून देशाची सर्वागीण प्रगती करावी, असा सल्ला माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी दिला.
अंबाझरी मार्गावरील विश्वैश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञान ‘अ‍ॅक्सीस १४’ ही प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएनआयटीचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, प्रा. जी.पी. सिंग, डॉ. यशवंत कटपातळ उपस्थित होते.  
डॉ. अब्दुल कलाम म्हणाले, तंत्रज्ञान हा देशाचा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात संशोधन झाले पाहिजे. परंतु भारत संशोधन क्षेत्रात अत्यंत मागे आहे. हे चित्र पालटण्याची वेळ आली आहे. संशोधन आणि चांगले शिक्षक मिळाले की भारतातील तंत्रज्ञान शिक्षणात गुणवत्ता निर्माण होईल. ही गुणवत्ता निर्माण झाली की, संपूर्ण जग तुमच्याकडे मोठय़ा आशेने बघेल. अभियंता, तंत्रज्ञापुढे समस्या येतातच. परंतु त्या समस्या आव्हान म्हणून स्वीकारल्या पाहिजे. १९९७ मध्ये एसएलव्ही वायूयान कोसळले होते. यावेळी मी स्वत त्या योजनेचा प्रमुख होतो. परंतु इस्त्रोच्या अभियंत्यांनी ही समस्या आव्हान म्हणून स्वीकारले आणि एकाच वर्षांत पुन्हा याच वायूयानाचे पुन्हा यशस्वी उड्डाण केले होते, हे उदाहरणही त्यांनी याप्रसंगी दिले. समस्या आव्हान म्हणून स्वीकारतात व त्या सोडवतात, तेच खरे आदर्श शिक्षक होय, असेही ते म्हणाले.
उत्कृष्ट नागरिक तयार करण्याचे काम आई, वडील आणि प्राथमिक शिक्षक करीत असतात. येथेच चारित्र्याची खरी निर्मिती होत असते. आज देशाला चारित्र्यवान व राष्ट्रप्रेम असणाऱ्या नागरिकांची गरज आहे.
कोणत्या प्रकारचे नागरिक राहतात, त्यावरून त्या देशाची ओळख ठरते, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधानही त्यांनी केले. शास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक व राष्ट्रपती म्हणून आपली ओळख आहे. परंतु आपणाला नेमके काय म्हणून ओळखले पाहिजे असे वाटते, एका विद्यार्थ्यांने विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी एक शिक्षक म्हणून ओळखले पाहिजे, असे सांगितले. यावेळी व्हीएनआयटीतर्फे त्यांचा स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली अप्रतिम कलाकृती देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. नरेंद्र चौधरी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेची माहिती दिली. तर डॉ. यशवंत कटपातळ यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. मेघा असावा या विद्यार्थीनीने संचालन केले, तर प्रा. जी.पी. सिंग यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास व्हीएनआयटीमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.