सामाजिक बांधीलकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिरासाठी यंदा इंग्लंडमधील ३० तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू येणार आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू व विख्यात बालशल्यविशारद डॉ. संजय ओक हेही या शिबिरात विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत.
या शिबिरात डोळे, गुडघे, पोटाच्या, लहान बाळांच्या तसेच मूत्रपिंड विकारासह विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोकांना केवळ औषधाचाच खर्च करावा लागणार असून २५ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान हे शिबीर आहे. इंग्लंडमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. रॉबर्ट डेव्हिस, डॉ. इयान थॉम्पसन, डॉ. पीटल लिन्सले, डॉ. आयलीफ आदी ३० डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.