लहान मुले, विद्यार्थी ते मोठय़ा माणसांपर्यंत सर्वाना उपयोगी पडतील, त्यांना वाचनाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या ज्ञानातही भर पडेल, अशा विविध विषयांवरील इंग्रजी भाषेतील काही पुस्तके लवकरच मराठी भाषेत येणार आहेत. राज्य मराठी विकास संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विज्ञानविषयक पाच पुस्तके तर ‘एनसीईआरटी’ची (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) सात पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी याविषयी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, इंग्रजी भाषेत विविध विषयांची माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यातील विज्ञानविषयक काही पुस्तके मराठीत आणण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत एकूण पाच पुस्तके मराठीत अनुवादित केली जाणार असून त्यापैकी एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. उर्वरित चार पुस्तकांचे काम लवकरच पूर्ण होऊन त्याचे प्रकाशन होईल.
इंग्रजी भाषेतील पार्थ घोष, दिपंकर होम, डॉ. नरेंद्र सहेगल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा ‘का आणि कसे’ हे या नावाने अनुवाद करण्यात आला आहे. संध्या पाटील-ठाकूर यांनी हा अनुवाद केला असून दैनंदिन जीवनात पडणारे विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरे यात आहेत.
या पुस्तकाबरोबरच ग्रह, तारे यांच्याविषयची माहिती देणारे ‘हॅलो स्टार्स’, ‘कुशाग्र बुद्धिचा डीएनए’, ‘निसर्गाची विविध बले’ (ऑन व्हेरियस फोर्सेस ऑफ नेचर) आणि ‘मनोरंजन आणि विज्ञान घरच्या घरी’ (फन अ‍ॅण्ड सायन्स अ‍ॅट होम) या पुस्तकांच्या अनुवादाचे कामही सुरू असल्याचे डॉ. सोलनकर        म्हणाले.
इतिहास, राजकारण, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अन्य काही विषयांवर ‘एनसीईआरटी’ने प्रकाशित केलेल्या सात पुस्तकांचाही मराठी अनुवाद प्रकाशित केला जाणार असल्याची माहितीही डॉ. सोलनकर यांनी दिली.