इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण हा जागृतजनांचा कौतुक करणारा सोहळा आहे. प्रसार माध्यम हे लोकजागृतीचे सशक्त माध्यम आहे. घरातील गणपतीचे पावित्र्य आपण पर्यावरणाच्यादृष्टीने राखू शकतो. प्रबोधनातूनच पर्यावरण जागृती साकारता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रकाश मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’ यांनी संयुक्तपणे राबवलेल्या इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले.
पर्यावरणपुरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा ही लोककल्याण चळवळीचा भाग आहे. घरच्या गणपतीसाठी आयोजित केलेली ही राज्यातील एकमेक स्पर्धा आहे. अशा उपक्रमांतून होणाऱ्या लोकजागृतीने प्रदूषणाला आळा घालता येईल, अशी आशा मुंडे यांनी व्यक्त केली.
प्रारंभी वीरेन्द्र रानडे यांनी ‘लोकसत्ता’च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चंद्रकांत ढाकुलकर यांनी ‘लोकसत्ता’ची भूमिका यावेळी मांडली. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नागपूर विभागातून नागपूरच्या सोनेगाव येथील किशोर सावंत हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. दुसरा पुरस्कार नागपूरच्याच राधा श्याम अतकरी यांना मिळाला. राजुऱ्याच्या चंदा पिंपळशेंडे, नागपूरच्या सुचिता सुर्जीकर व करुणा देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. पहिल्या क्रमांकाला रोख ९ हजार ९९९ रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह, तर दुसऱ्या क्रमांकाला रोख ६ हजार ६६६ रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी रोख २००१ रुपयांसह प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने यापूर्वी आयोजित केलेल्या ‘संकल्प हरित पर्यावरणाचा’बाबत अभिनव संकल्प स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काही दिवसांपूर्वी मुंबईत झाला. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रसचे योगेश देशमुख यांना या कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मुले पर्यावरणदृष्टय़ा साक्षर झाली तर कुटुंबाला साक्षर करू शकतात. पर्यावरण जागृतीसाठी मुलांकडून विविध उपक्रम करून घेतले. झाडे लावून घेतली. यात बरेच यश आल्याचे मनोगत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
गणेशोत्सवात काही तत्त्वे पाळली तर चांगल्याप्रकारे तो साजरा करता येईल. गणेश मूर्ती शाडूच्या मातीची असावी, ती विसर्जित करताना घरीच खड्डा करून स्वच्छ पाणी टाकून त्यात विसर्जित करावी म्हणजे व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि निर्माल्याचे खतही उपयोगात येईल, असे मनोगत प्रथम पुरस्कार विजेते किशोर सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन खास प्रतिनिधी राम भाकरे, संयोजन उप वितरण व्यवस्थापक ज्ञानेश्वर महाले, तर आभार सहायक वितरण व्यवस्थापक गजानन बोबडे यांनी मानले. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अतुल सातफळे, ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे उपमहाव्यवस्थापक (स्पेस मार्केटिंग) बद्रुद्दीन ख्वाजा, सहसंपादक चंद्रकांत ढाकुलकर व मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेन्द्र रानडे उपस्थित होते.