मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या विकासाचे कारण पुढे करीत अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विदेशात फेरफटका मारणाऱ्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या १२१ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. विदेश दौऱ्यावरून पतरल्यावर अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल आणि त्यांचे आर्थिक व्यवहार आदींची चौकशी होणार आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी अभ्यास करण्याचे निमित्त सांगत मुंबई ‘एमआरव्हीसी’तील तब्बल १२१ अधिकाऱ्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये विदेशवारी केली. व्यवस्थापकीय संचालक पी. सी. सहगल यांनी सात वेळा, ए. के. वर्मा यांनी चार वेळा, तर राकेश सक्सेना यांनी एकदा विदेशवारी केली. बोरिवली-विरार आणि कुर्ला-ठाणे दरम्यान अतिरिक्त मार्ग टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी विदेशवारी केल्याचे आढळून आले आहे.
रेल्वेच्या जमिनींचा व्यापारी विकास कसा करायचा आणि उपलब्ध जागेवर अतिरिक्त मार्ग टाकण्याबरोबरच अन्य काही बाबींचा अभ्यास करण्यासाठी हे अधिकारी विदेशात गेले होते. गेल्या १० वर्षांमध्ये विदेश दौऱ्यांवर एकूण दोन कोटी ९२ लाख ७७ हजार ५५९ रुपये खर्च झाला असून आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मिळवली असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या विदेश दौऱ्याचा अहवाल महामंडळास सादर केला होता. मात्र ते अहवाल मुंबईच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने उपयुक्त नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता सर्वच अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल तपासण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे या अभ्यास दौऱ्यांवर त्यांच्यासमवेत गेलेल्या व्यक्तींचा खर्च कोणी केला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराचीही तपासणी करण्यात येणार आहे.