News Flash

नाट्यरंग : घराणेशाहीचे रंजक विडंबन

आचार्य अत्र्यांनी ५० वर्षांपूर्वी ‘मी उभा आहे!’ हे राजकीय विडंबननाटय़ लिहून राजकारणातील भंपकपणावर चांगलेच कोरडे ओढले होते. अत्रे स्वत:ही पुणे महापालिकेत निवडून गेले होते आणि

| March 17, 2013 12:34 pm

आचार्य अत्र्यांनी ५० वर्षांपूर्वी ‘मी उभा आहे!’ हे राजकीय विडंबननाटय़ लिहून राजकारणातील भंपकपणावर चांगलेच कोरडे ओढले होते. अत्रे स्वत:ही पुणे महापालिकेत निवडून गेले होते आणि आपण नगरसेवकरूपी ‘दगड’ सांभाळल्याचा दावा त्यांनी त्या वेळी केला होता. खरं तर ५० वर्षांपूर्वी आजच्याइतकी भयावह परिस्थिती राजकारणात नव्हती. त्या काळी अनेक नि:स्वार्थी आणि सेवाभावी व्यक्ती नगरपालिकेपासून संसदेपर्यंत निवडून जात असत. जनतेच्या हितासाठी ते तळमळीनं झटत. त्यांची राहणी साधी असे. राजकारणातून स्वार्थ साधण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसे. नाथ पै, मधु दंडवते, नानासाहेब गोरे, एसेम जोशी यांच्यासारखी स्वच्छ चारित्र्याची मंडळी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करीत. असं असतानाही अत्र्यांना राजकीय विडंबननाटय़ लिहावंसं वाटावं त्याअर्थी त्या काळीही काही स्वार्थी, आपमतलबी लांडगे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येत असणार. आज तर या किडीचा पार नायटा झालेला आहे. आज साधा-सरळ, चारित्र्यवान माणूस राजकारणाच्या चिखलात उतरायचा विचारही करू शकत नाही. एखाद्याने त्यातूनही हिंमत केली तरी तो निवडून येणं शक्य नाही. कारण निवडणुकीसाठी लागणारा प्रचंड पैसा, गुंडगिरीची ताकद आणि मतदारांना ‘मॅनेज’ करण्याच्या क्लृप्त्या त्याला जमणंच शक्य नाही. आज केवळ सत्तेच्या वा गुंडगिरीच्या माध्यमातून प्रचंड ‘माया’ केलेले राजकीय गॉडफादर असलेले आणि नेत्यांची पोरंबाळं तसेच आप्तस्वकीय वा हितसंबंधीच फक्त राजकारणात उतरू शकतात आणि निवडून येऊ शकतात, ही कटू वस्तुस्थिती आहे आणि कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. (मार्क्‍सवादी कम्युनिस्ट सोडून!) तोंडात जनतेच्या भल्याची भाषा; परंतु सत्तेचा वापर करून आपल्या दहा पिढय़ांची तरतूद करून ठेवण्याच्या ईर्षेनं आज सगळ्या राजकारण्यांना पछाडलं आहे. साधा नगरसेवकही पहिल्या सहा महिन्यांतच प्रशस्त फ्लॅट, आलिशान मोटार, गळ्यात बलदंड सोनसाखळ्या, दहाही बोटांमध्ये सोन्याच्या जाडजूड अंगठय़ा, फार्महाउस, गावाकडे गडगंज प्रॉपर्टी उभी करतो; मग आमदार-खासदारांची तर बातच सोडा! तरीही जनतेनं यांच्या ‘समाजसेवे’वर विश्वास ठेवावा अशी यांची इच्छा असते. सत्ताकारणाची ही कीड आज गावा-गावापर्यंत पोहोचलीय. त्याचंच लखलखीत दर्शन घडवणारं नाटक म्हणजे- ‘सग्गळे उभे आहेत!’
कारेगावचे सरपंच निवृत्तीअण्णा उभे यांचं निधन होतं आणि त्यांच्या शोकसभेतच त्यांचा ‘वारसा’ पुढे चालवण्यावरून वादाला तोंड फुटतं. सभेतल्या वामन उकिडवेच्या भाषणातूनच अण्णांचं ‘कॅरॅक्टर’ आपल्याला ज्ञात होतं. त्यांना तीन पोरं. थोरला रमेश, मधला प्रताप ऊर्फ सिमेंट आणि धाकटा बबन ऊर्फ भावज्या. निवृत्तीअण्णा असे तो त्यांच्या दहशतीमुळे घरात एकोपा नांदला असला तरी ते जाताच त्यांचा राजकीय वारसा सांगण्यासाठी घरातच दुफळी (नव्हे, तिफळी!) माजते. अण्णांची पत्नी शारदाबाईही (जी तोवर चूल आणि मुलं सांभाळण्यातच धन्यता मानत आली होती!) त्यांच्या ‘फेव्हिकॉल’ (खुर्ची) वर दावा ठोकते. थोरला असलेल्या रमेशला आपल्याला बिनबोभाट अण्णांचं सरपंचपद मिळेल अशी अपेक्षा असते. पण आईनेच आपण आमदार अण्णासाहेबांच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यावर रमेश गडबडतो. तिला समजवायचा प्रयत्न करतो. पण शारदाबाई आपल्या भूमिकेवर ठाम असतात. रमेशची पत्नी हर्षदा समजूतदार, शिकलेली असते. ती सर्वाना समजवायचा प्रयत्न करते. पण कुणीच तिचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. तशात मधल्या प्रतापची बायको मोनिका त्याला उचकवते- ‘तुम्ही आत्ताच उठाव करून निवडणुकीच्या रिंगणात उतरला नाहीत तर पुढचा उभा जन्म थोरल्याच्या उष्टय़ा खरकटय़ावर आपल्याला आयुष्य काढावं लागेल.’ व्यायामशाळेतल्या उनाड पोरांबरोबर गावभर उकिरडा फुंकणाऱ्या रेम्याडोक्याच्या प्रतापला खरं तर असल्या झंझटीत काहीच गम्य नसतं. पण बायकोनं जबरदस्तीनं घोडय़ावर बसवल्यावर त्याचाही नाइलाज होतो. तोही शड्डू ठोकून मैदानात उतरतो.
तिसरा बबन्या ऊर्फ भावज्याला हे काही पसंत नसतं. त्याला आपला ढाबा वाढवायचा असतो. त्यासाठी पैसा हवा असतो. तो बाप काही देत नाही आणि आता घरातल्या या भांडणात तो मिळण्याची शक्यताच नसते. तेव्हा तो वामन उकिडव्याला ‘फेव्हिकॉल’ (अण्णांची सरपंचपदाची खुर्ची) आणि ‘उभे’ कुटुंबातल्या भानगडींची बित्तंबातमी देण्याच्या बदल्यात सहा लाख रुपयांची तोडपाणी करतो. उकिडव्याने सगळ्या गावाच्या घुगऱ्या खाल्लेल्या असतात. त्यामुळे भावज्याला साडेचार लाखांतच तो गुंडाळतो. भावज्याही काही कमी नसतो. त्यानंही उकिडव्याला सगळा ‘मालमसाला’ पुरवलेला नसतोच.
इतक्यात सरपंचपद महिलांसाठी राखीव झाल्याचं घोषित होतं आणि रमेश व प्रतापचे पत्ते कट होतात. आता पुढं काय? शारदाबाईंना वाटतं- आता आपली निवड बिनविरोध होणार! पण प्रतापची महत्त्वाकांक्षी बायको मोनिका आपली उमेदवारी जाहीर करते. रमेशही मग गर्भवती हर्षदाला तिचा विरोध असतानाही निवडणुकीच्या आखाडय़ात उतरवतो.
मग एकच धुमश्चक्री उडते. आरोप-प्रत्यारोप, प्रतिपक्षाच्या समर्थकाला (प्रतापला) मारहाण, निवृत्तीअण्णांच्या ठेवलेल्या बाईचं- रेश्माचं अचानक प्रकटणं आणि त्यांच्या इस्टेटीवर दावा सांगणं.. या सगळ्या गदारोळात कशीबशी निवडणूक पार पडते; पण हर्षदाच्या बाळाचा बळी देऊन!
लेखक क्षितिज पटवर्धन यांनी आजच्या ग्रामीण राजकारणाचं मासलेवाईक चित्र ‘सग्गळे उभे आहेत!’मध्ये धमाल रंगवलं आहे. रांगडय़ा, गावरान, मस्तवाल व्यक्तिरेखा हा राजकीय विडंबननाटय़ाचा ‘यूएसपी’ (युनिक सेलिंग पॉइंट) त्यांनी यात छान प्रकारे हाताळला आहे. परंतु वामन उकिडवे हे पात्र विनोदी करण्याच्या नादात त्यांनी ते हास्यास्पदतेच्या पातळीवर आणलं आहे. (प्रियदर्शन जाधव यांनीही ते साकारताना अतिरेक केला आहे. स्वस्त मनोरंजन आवडणाऱ्यांना कदाचित ते आवडू शकतं.) नवऱ्याच्या सरपंचपदावर दावा सांगणाऱ्या शारदाबाईही हव्यातितक्या खमक्या वाटत नाहीत. दोन गेंडय़ांच्या साठमारीत त्या अडगळीत पडल्या आहेत. त्यांचा सुरुवातीचा जोश पुढे टिकत नाही. ग्रामीण राजकारणातील घराणेशाहीच्या खाचाखोचा आणि त्यातले पेच, डावपेच, शह-काटशह ज्या प्रकर्षांनं नाटकात यायला हवे होते तितके ते येत नाहीत. कदाचित मनोरंजनाचा डोस वाढवण्याच्या अपरिहार्यतेमुळे त्याकडे लेखकाचं दुर्लक्ष झालं असावं. भावज्याचं कारस्थान मात्र या सगळ्या कल्लोळात बेदखल राहतं. राजकारणापायी एक अनाम कळी मात्र खुडली जाते. यातलं कारुण्य नाटकाअखेरीस अधोरेखित करून लेखकानं घराणेशाहीच्या अतिरेकाला एक सणसणीत चपराक लगावली आहे. हे सारं असलं तरी नाटकाचा मुख्य हेतू काय? तर- मनोरंजन! तो ‘सग्गळे उभे आहेत’मध्ये पुरेपूर साध्य झाला आहे.
दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी राजकीय विटंबनाचा भाग पहिल्या प्रवेशापासूनच- सरपंच निवृत्तीअण्णांच्या शोकसभेपासूनच पकडायचा प्रयत्न केला आहे. पण झालंय काय, की प्रेक्षकानुनय करण्याच्या प्रयत्नात वामन उकिडवेचं भाषण नकोइतकं ‘स्मार्ट’ आणि हास्यास्पद झालं आहे. मात्र, दुसऱ्या प्रवेशापासून दिग्दर्शकाला सूर गवसला आहे. त्यानंतर सबंध नाटक एका लयीत उपहास-उपरोधासह मार्गी लागलं आहे. यातल्या पात्रांना वर्तमान संदर्भ देण्याचा प्रयत्न प्रताप ऊर्फ सिमेंटच्या गळ्यातील आणि हातातील चांदीच्या वजनदार दागिन्यांनी केला गेला आहे. आजचे राजकारणी आपल्या श्रीमंतीचं कसं ओंगळवाणं प्रदर्शन करतात आणि त्यातच त्यांना कशी फुशारकी वाटते, हे त्यातून सूचित केलेलं आहे. पात्रांना ठाशीव रूप देताना प्रत्येकाचा स्वतंत्र विचार दिग्दर्शकानं केल्याचं जाणवतं. त्यांचं जेश्चर, पोश्चर, बोलण्याची ढब, व्यक्त होण्याची पद्धती, त्यांचे स्वभाव यांचा बारकाईनं विचार झालेला आहे. त्यामुळे ती जिवंत झाली आहेत. तरीही शारदाबाईंवर दिग्दर्शकानं अधिक लक्ष पुरवायला हवं होतं असं वाटतं. तमासगिरीण रेश्मा हे पात्रही तसं उपरंच राहतं.. ठिगळ चिकटवल्यासारखं! हर्षदाच्या रूपाने सदसद्विवेकाचा एक धागा नाटकात येतो. पण तो फारच क्षीण आहे. तो अधिक जोरकसपणे येता तर नाटकाच्या शेवटाकडचा शोकान्त जास्त परिणामकारक ठरला असता.
प्रसाद वालावलकरांनी गावाकडचं सरपंचाचं प्रशस्त, ऐसपैस घर नेटकेपणी उभं केलं आहे. शीतल तळपदेंच्या प्रकाशयोजनेनं यातले नाटय़पूर्ण क्षण प्रभावी केले आहेत. क्षितिज पटवर्धन यांचं शीर्षकगीत नीटसं ठसत नाही. चैतन्य आडकरांच्या पाश्र्वसंगीतानं प्रसंगांतले भाव गडद केले आहेत. महेश शेरला यांची वेशभूषा आणि संदीप नगरकर-प्रदीप दर्णे यांच्या रंगभूषेनं पात्रांना चपखल बाह्य़ व्यक्तिमत्त्व बहाल केलं आहे.
हेमंत ढोमे यांचा चापलूस, फटकळ, पण अंतर्यामी सरळसाधा असा विरोधाभासी बबन्या ऊर्फ भावज्या आपल्या खास ग्रामीण ढंगात, बोलीच्या इरसाल लहेज्यासह अफलातून साकारला आहे. त्यांचा सहज वावर अन् ग्राम्य अभिव्यक्ती थक्क करणारी आहे. त्यांच्याबरोबरीनंच आरती वडगबाळकर यांनीही हिकमती, महत्त्वाकांक्षी मधली सून मोनिका तिच्या तोऱ्या-फणकाऱ्यासह मूर्तिमंत उभी केली आहे. सुशील इनामदारांचा प्रताप ऊर्फ सिमेंट हा सत्तांध बापाचा उनाडटप्पू कार्टा असल्याचं सही सही सिद्ध करतो. रेम्याडोक्याचा, पण बायकोनं पढवल्यावर गाढवागत मुकाट तिचा पदर धरून ती म्हणेल तसं करणारा, वागणारा सिमेंट मुळात वाईट नाहीए. हे त्याचं दुहेरी रूप सुशील इनामदार यांनी बिनचूक वठवलं आहे. सुशिक्षित; पण सत्ताकांक्षेनं आंधळा झालेला रमेश- अंबरीश देशपांडे यांना अचूक सापडला आहे. गर्भवती हर्षदाची नाजूक स्थिती लक्षात न घेता निवडणुकीच्या रणधुमाळीत तिला आपल्या स्वार्थाकरिता पाकटवणारा रमेश क्रौर्याची हद्द गाठतो. बापाचा राजकीय वारसा मुलानंच चालवायचा, या पारंपरिक संस्कारांनी त्याची विवेकबुद्धी नष्ट केली आहे. यात हर्षदा आणि तिचं बाळ नाहक भरडलं जातं. मुग्धा कर्णिकांनी विचारी; समजूतदार, सोशीक हर्षदा काही वेळा नुसत्या नेत्रकटाक्षानंही समूर्त केली आहे. उज्ज्वला जोग यांनी पतीच्या पश्चात सहानुभूतीचा लाभ उठवून राजकारणात प्रवेशणाऱ्या बिनबुडाच्या कचकडय़ाच्या बाहुलीचं प्रतिनिधित्व शारदाबाईंच्या रूपात केलं आहे. बहुसंख्येचं राजकारण करणाऱ्यांना अशा ‘निरुपद्रवी’ लोकांची गरज असतेच. म्हणूनच यातले आमदार अण्णासाहेब हे शारदाबाईंच्या पारडय़ात आपलं वजन टाकतात. उज्ज्वला जोग यांनी अशा कळसूत्री बाहुलीची ‘भूमिका’ यात बजावली आहे. पण त्यांना संहितेचं पाठबळ म्हणावं तितकं लाभलेलं नाही. प्रियदर्शन जाधव यांचा बेवडा वामन उकिडवे हशे वसूल करण्याच्या नादात नकोइतका घसरला आहे. रूपाली मांगले (रेश्मा तमासगिरीण) आणि सुधीर रोकडे (प्रचारप्रमुख) यांनी आपापली कामं व्यवस्थित केली आहेत.
राजकीय विडंबनाचा मालमसाला ठासून भरलेलं हे नाटक प्रेक्षकशरण करमणुकीच्या आहारी न जातं तर अधिक प्रभावी ठरलं असतं यात संशय नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:34 pm

Web Title: entertaining parody on political dynasty
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘लुटेरा’साठी घेतली ‘लिबर्टी’
2 आधी मद्यपान; नंतर गीतगान
3 चौकटीपल्याडच्या नावीन्याचा ध्यास
Just Now!
X