18 September 2020

News Flash

‘मिरगाचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ यंदा साधणार

गेली चार वष्रे हुलकावणी देणाऱ्या पावसाने यंदा वेळेत आणि दमदार हजेरी लावल्याने सुखावलेल्या बळीराजाने ‘मिरगाचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ साधण्यासाठी चाडय़ावर मूठ ठेवत खरिपाची पेरणी

| June 13, 2013 01:52 am

गेली चार वष्रे हुलकावणी देणाऱ्या पावसाने यंदा वेळेत आणि दमदार हजेरी लावल्याने सुखावलेल्या बळीराजाने ‘मिरगाचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ साधण्यासाठी चाडय़ावर मूठ ठेवत खरिपाची पेरणी सुरू केली. वळिवाने विलंबाने हजेरी लावली असली, तरी पेरणीपूर्व मशागतीला फाटा देत जिल्’ााच्या बहुतांश भागांत खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. बाजारात बियाण्यांची उपलब्धता चांगली असली, तरी महाबीजच्या सोयाबीन बियांची कमतरता जाणवत आहे.
गेली चार वष्रे मृग नक्षत्राचा पाऊस कधी अल्पसा, तर कधी पूर्णत: उघडीप अशी स्थिती असल्यामुळे खरिपाचा पेरा होण्यास आद्र्रा नक्षत्राची वाट पाहावी लागत होती. गेल्या वर्षी दुबार पेरणीचे संकट कोसळले होते तरीसुद्धा खरीप साधलाच नाही.
चालू वर्षी मात्र रोहिणीच्या अंतिम टप्प्यात जिल्हय़ात बहुतांशी भागात वादळ-वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. विटा, आटपाडी भागात तर ताली भरण्याइतपत पावसाने सुरुवात केली. उशिरा उन्हाळी पाऊस सुरू झाल्याने शेतीतील मशागतीची कामे मात्र, शेतकऱ्यांना पूर्ण करता आली नाहीत.
मशागतीच्या कामांना पूर्ण फाटा देऊन मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट कुरी रानात घातली आहे. घात आलेल्या म्हणजेच वापसा असणाऱ्या शेतात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. छावणीतील बल आता मालकाच्या रानात पेरणीसाठी सज्ज केले आहेत.
ज्यांच्याकडे पेरणीसाठी बल नाहीत असे लहान शेतकरी भाडय़ाने बलजोडी घेऊन पेरणीची घात साधण्यासाठी जीवतोड प्रयत्न करीत आहेत. १ एकर पेरणीसाठी बलजोडीला १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एवढी रक्कम मोजूनसुद्धा वेळेवर बलजोडी मिळेलच याची शाश्वती नसल्याने शेतकरी बलकऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
सांगली जिल्हय़ात खरीप पेरणीलायक ४ लाख ४१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी ४५ हजार ३५५ क्िंवटल बियाण्यांची गरज चालू वर्षी भासणार आहे. सर्वाधिक लागवड संकरित ज्वारीची होईल अशी अपेक्षा धरून कृषी विभागाने तशी तयारी ठेवली आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या क्षेत्रात प्रामुख्याने सोयाबीनसारख्या नगदी पिकांवर जोर देण्यात येतो. त्यामुळे ज्वारीपाठोपाठ सोयाबीनखालील क्षेत्र मोठय़ा प्रमाणात असणार आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्वारीखालील क्षेत्र २० हजार, तर सोयाबीन खालील १९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. भात (४५६०),बाजरी (२२५०), मका (८२००), भुईमूग (३०००) आणि कडधान्ये मूग (७००), उडीद (१५०), तूर (४००), सूर्यफूल (१२५) अशा पद्धतीने खरिपाची पेरणी अपेक्षित आहे.
बाजारात सोयाबीनचे बी उपलब्ध आहे. शासकीय अनुदानामुळे महाबीजच्या सोयाबीनचा दर कमी असला, तरी बाजारात मात्र बियाण्यांचा दर  प्रति ३० किलो १३५० ते १८०० असा आहे. ९३०५ या सोयाबीनला चांगली मागणी आहे. संकरित ज्वारीच्या ७ व ९ नंबर वाणाला शेतकऱ्यांकडून जास्त पसंती आहे. या बियाण्यांचा दर २०० ते २१० प्रति ३ किलो आहे. भुईमूग, मूग, उडीद या कडधान्याच्या बियाण्यांचे दर मात्र गगनाला भिडले असून किलोला १०० ते १२५ रुपये मोजावे लागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2013 1:52 am

Web Title: enthusiasm in farmers due to rain in time
Next Stories
1 कृषी उत्पादन आराखडा करणा-या गावांना अनुदान- कृषिमंत्री विखे
2 आता बिनधास्तपणे खा फळे!
3 कारवाईसाठी पकडलेला वाळू वाहतुकीचा मालट्रकच पळविला
Just Now!
X