युती आणि आघाडीमधील नाते संपुष्टात येताच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांना पळवापळवीचे प्रकार सुरू झाले असून त्यातील काहींनी उमेदवारी मिळण्यासाठी स्वपक्षाचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला आजपर्यंत शहरातील सहाही मतदारसंघातून काँग्रेसमुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्षांचे अनेक कार्यकर्ते यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करीत असताना काँग्रेसचे आमदार दीनानाथ पडोळे, रामटेकचे चंद्रपाल चौकसे, माजी मंत्री रणजित देशमुख यांचे चिरंजीव अमोल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. दक्षिणमधून राष्ट्रवादीचे राजू नागुलवार दावेदार असताना काँग्रेसच्या दीनानाथ पडोळे यांनी उमेदवारी मागितल्याने कार्यकत्यार्ंनी त्यांना कार्यालयातून पिटाळून लावले. काँग्रेसने सहाही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले असले तरी काही कार्यकत्यार्ंनी पक्षाचा बी फॉर्म पळविणे सुरू केले आहे.
दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसचे संजय महाकाळकर आणि यशवंत कुंभलकर हे दोन्ही नेते भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आभा पांडे मध्य नागपूर आणि राजा द्रोणकर उत्तर नागपुरातून इच्छुक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तशी मागणी केली आहे. भारिप-बहुजन महासंघाचे डॉ. मिलिंद माने यांना भाजपने उत्तर नागपुरातून उमेदवारी दिली असून त्यांनी अर्ज दाखल केला. विविध राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची पवळापवळी सुरू असताना काही नेते मात्र बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. कुठल्याही राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून लढू, असा निर्धार काही नेत्यांनी केला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर संघर्ष करणारे विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीचे प्रमुख अहमद कादर यांनी बसपामध्ये प्रवेश केला आणि त्यांना मध्य नागपुरातून तर माजी नगरसेवक जमालभाई यांना उत्तर नागपुरात उमेदवारी दिली जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे दक्षिण नागपुरातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, किरण पांडव यांचे नाव समोर आले आहे. पांडव निवडणूक लढतील तर भाजपचा बंडखोर लढणार नाही, असा शब्द भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. मात्र ही केवळ अफवा असून सावरबांधे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. महालातील वाडय़ावर विविध राजकीय पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेते नितीन गडकरी यांची भेट घेत असून त्यात काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांचा समावेश आहे.