शहराच्या गोदाघाटाच्या सौंदर्याची ओळख संपूर्ण देशात होण्याच्या हेतूने येथील नाशिक कलानिकेतन संचलीत चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या अमृत महोत्सवातंर्गत राष्ट्रीय स्तरावरील प्रत्यक्ष व्यक्ती आणि निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० व ३१ जानेवारी रोजी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.
चित्रकलेचा प्रसार, प्रचार व संवर्धन तसेच सर्वसामान्यांची कलाविषयक जाण वृध्दिंगत करण्यासाठी प्रसिध्द चित्रकार कलामहर्षि वासुदेवराव कुलकर्णी तथा दादा यांनी १९४० मध्ये नाशिक कलानिकेतन या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या ध्येय व धोरणांचा भाग म्हणून संपूर्ण कलेचे रितसर व शास्त्रशुध्द शिक्षण देण्यासाठी चित्रकला महाविद्यालय सुरू करण्यात आले. २०१५ या वर्षांत संस्था अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण करत असून याच वर्षी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. गेल्या ७२ वर्षांपासून संस्थेच्या वतीने सातत्याने घेण्यात येणाऱ्या चित्रकला स्पर्धेस त्यामुळेच महत्व प्राप्त झाले आहे. कलेच्या दृष्टिने महत्वपूर्ण अशा व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रण स्पर्धेत दरवर्षी साधारणपणे २०० पर्यंत कला महाविद्यालयांमधील विद्यार्थी तसेच गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांमधील स्पर्धकही भाग घेत असतात.
३० जानेवारी रोजी व्यक्तिचित्रण स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या इमारतीत सकाळी १० ते सायंकाळी पाच तर ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी तीनपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्गचित्रणासाठी गोदाघाट आणि परिसरात चित्रण करून ३१ जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करावयाचे आहे.
बक्षीस वितरण त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे. एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.