नोकऱ्या मागणारे तरुण घडवणारी नव्हे तर रोजगाराची निर्मिती करणारे उद्योजक घडवणारी शिक्षणपद्धती निर्माण करण्याची गरज माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली. पवई आयआयटीच्या ५४ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कलाम बोलत होते.
देशाची सध्याची स्थिती पाहता उद्योजकतेला वाव देणारी शिक्षणपद्धती विकसित करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठीची त्रिसूत्रीही कलाम यांनी नमूद       केली.
विद्यार्थ्यांमधील उद्ममशीलतेला वाव देणारे शिक्षण असायला हवे. त्यामुळे ते व्यवसाय सुरू करण्यास उद्युक्त होतील व त्यांच्या नवनिर्मिती क्षमतेला चालना मिळेल आणि संपत्तीची निर्मिती होईल. दुसरे म्हणजे अशा उद्यमशील तरुणांच्या व्यवसायास आर्थिक साह्य देण्यास तत्पर असलेली बँकिंग व्यवस्था असायला हवी. तिसरे म्हणजे या नवीन उद्योजकांना अतिरिक्त नफ्याचा सोस न धरता रास्त दरात उत्पादने बाजारात आणावीत. त्यामुळे स्पर्धेत त्यांचा टिकाव लागेल व ते यशस्वी ठरतील, असे कलाम म्हणाले.
तसेच ‘आयआयटी’नेही उद्योजक विद्यार्थ्यांना मदत होईल असे बाजारपेठेचे संशोधन अहवाल तयार ठेवावेत. त्यामुळे कोणत्या उत्पादनांचा व्यवसाय सुरू करायचा, कशात संधी आहेत याची माहिती तरुण उद्योजकांना उपलब्ध होईल व त्यांच्या आरंभीच्या काळात त्याची मोठी मदत होईल, अशी सूचनाही कलाम यांनी ‘आयआयटी’ प्रशासनाला केली. त्याचबरोबर तरुण उद्योजकांच्या यशोगाथांचे संकलन करून ती माहितीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कलाम यांनी केले.  
यावेळी विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही कलाम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात श्रीमती नीरा अडारकर, डॉ. जयंत सबनीस, डॉ. नागेश पालेपू, डॉ. डॅनियल डायस, अमरनाथ भिडे, शंतनु खोसला, अशोक कामथ, सत्यजित मेयर, सत्येंद्र पखाले यांचा समावेश होता.