उद्योग, व्यवसाय, व्यापार व तत्सम क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी यशासाठी घर, गाव, राज्य यांच्या सीमारेषा न बाळगता सर्वत्र पाय रोवले पाहिजे. यश मिळवण्यासाठी चौफर विस्तारित होण्याचे आवाहन गुजरातमधील सरदार पटेल बिझनेस कॉन्सिलचे गौतमराज हिंदुस्थानी यांनी केले.
शिवाजी इंटरप्रिन्युअर्स असोसिएशनद्वारा बुटीबोरी येथे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सनदी लेखापाल विजयकुमार शिंदे, प्रभाकरराव देशमुख, उदय टेकाडे, सुभाष बांते, सुधांशू मोहाड, दिनेश ठाकरे, तसेच राज्यभरातून आलेले विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदुस्थानी म्हणाले, यशस्वी होण्यासाठी तसेच आपला व्यवसायासाठी आपण संघटित व्हावे. व्यवसायातील नवनवीन क्षेत्रात प्रवेश करावा. कोणत्याही स्पर्धा नसलेल्या नवीन व्यवसायात प्रवेश करावा, आपल्या स्वानुभवातून त्यांनी कशाप्रकारे विविध व्यवसाय करून यश मिळवले त्याचा आढावा घेतला. आपल्या घराच्या गावाच्या सीमारेषा तोडून आपला व्यवसाय वाढवण्याठी जनसंपर्क वाढवावा. कोणताही संकोच न बाळगता, आत्मविश्वास ढळू न देता सदैव प्रयत्नरत राहावे. आपला व्यवसाय, उद्योग अथवा व्यापार कसा राहील याकडे लक्ष द्यावे. गुणवत्ता जोपासावी यशसाठी कोणताही लघुमार्ग वापरू नये. शिवाजी इंटरप्रिन्युअर्स असोसिएशनच्या माध्यमातून संघटित व्हावे. आपल्या अनुभवांचा, कार्यप्रणालीचा एकमेकांनी उपयोग करून द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या बैठकीला गुजरातसह मुंबई, सोलापूर, नागपूर, बीड, पुणे आदी शहरातून ४० प्रतिनिधी आले होते. या बैठकीत विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपले अनुभव मांडले.