केरकचरा व घाणीमुळे शहराची सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यही धोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, आपणच पुढाकार घेतल्यास किमान आपल्या परिसराची स्वच्छता व आरोग्य अबाधित राहू शकते, असे उदाहरण शहराच्या शिवनेरीनगर येथील जवाहर कॉलनीतील नागरिकांनी समोर ठेवले. सार्वजनिक स्वच्छतेकडे यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असताना कोठेही दाद वा फिर्याद न करता  स्वयंस्फूर्तीने परिसर स्वच्छ करण्याचा सुमारे ३५ जणांचे एकत्रित प्रयत्न निर्ढावलेल्या प्रशासनाला चपराक लगावणारा, परंतु नागरिकांना चांगला पर्यायही देणारा ठरला.
वाढलेले गवत, जागोजागी केरकचरा, त्यामुळे पसरलेली दुर्गंधी, परिणामी परिसराचे धोक्यात आलेले आरोग्य या चक्रात जवाहर कॉलनीतील रहिवासी चांगलेच त्रस्त झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील एकूणच सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न सोयीस्कर दुर्लक्षिला जात आहे. शहराचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रश्नावर महापालिका वा अन्य संबंधितांकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही, तसेच हा प्रश्न सोडविण्याची कोणतीही इच्छाशक्ती व मानसिकता दिसत नाही. त्यामुळे केवळ चर्चा व तक्रार या पलीकडे ठोस काही घडत नाही. अशा वेळी नेहमीचा सोशिकपणा दाखवून शांत बसण्याशिवाय आपण दुसरे काय करू शकतो, असा विचार कोणाही सुजाण नागरिकाच्या मनात आल्यास नवल नाही. परंतु म्हणूनच स्वस्थ न बसता आपणच काही तरी करावे, या विचाराने जवाहर कॉलनीतील रहिवासी एकत्र आले आणि विचाराला कृतीची जोड मिळाली. गेल्या १९ ऑक्टोबरपासून या रहिवाशांनी सुमारे ५ हजार चौरस फूट मोकळ्या जागेवरील गाजर गवत काढले. खराब झालेले खेळाचे साहित्य हटविले. कचऱ्याचे ढीग हलवून अंतर्गत रस्तेही साफसूफ केले. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वचजण स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या परिसर स्वच्छतेमध्ये सहभागी झाले. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य हा सर्वाचा हक्क आहे, असा संदेश या आगळ्या अभियानातून येथील रहिवाशांनी दिला.
छावा संघटनेचे रवींद्र बोडखे, सी. जी. आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव चौधरी, बाबुराव तवार, पी. एस. जोशी, दिलीप देशमुख, दीपक महालपुरे, ऋषिकेश मोहिते, अॅड. कोतकर, अनिल पाटील, एम. एन. दौंड, रावसाहेब कदम, भावना कटारिया, मंगला दौंड, सारिका साळुंके, सत्यभामा पाटील, मनीषा भोंदवे आदी यात सहभागी झाले होते.