विकासाच्या नावाखाली उरण परिसरात सुरू असलेला निसर्गाचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा निर्धार उरणमधील तरुणांनी नववर्षांत केला आहे. डोंगर, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या दरम्यान जास्तीत जास्त स्वयंसेवक तयार करण्याचा संकल्पदेखील फॉन या संस्थेने केला आहे.
उरण तालुक्यातील चिरनेरसारख्या अतिदुर्गम भागातील काही तरुणांनी एकत्रित येऊन तालुका व आजूबाजूच्या परिसरांत विकासाच्या नावाने होणारा पर्यावरण व निसर्गाचा ऱ्हास थांबवून निसर्गातील वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १३ वर्षांपूर्वी फ्रेन्डस ऑफ नेचर (फॉन) या संस्थेची करण्यात आली. त्यानंतर या परिसरात गावोगावी निसर्गप्रेमी संस्था स्थापन झाल्या आहेत. या १३ वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या अनेक सदस्यांनी वन्यजीवांचे संरक्षण करून त्यांना जीवदान देण्याचा व निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
यापुढेही निसर्गाच्या संरक्षणासाठी झटण्याचा संकल्प संस्थेतील स्वयंसेवकांनी जाहीर केला आहे. वृक्षतोड, मातीच्या भरावासाठी पोखरण्यात येणारे डोंगर यामुळे उरणमधील निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम वन्यजीवांवर झाला असून अनेक वन्यजीवांच्या जाती नष्ट होऊ लागल्या आहेत. जंगले आणि वनराई नष्ट होत असल्याने साप आदी वन्यप्राणी नागरी वस्तीत दाखल होत आहेत. यामुळे नागरी वस्तीत दाखल होणाऱ्या या सापांना नागरिकांच्या भयापोटी मारण्यात येत होते.
यासाठी चिरनेरमधील तरुणांना शहर तसेच ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करीत सापांना मारू नका, आम्हाला फोन करा म्हणून जनजागृती करून अनेक सापांना जीवदान दिले आहे. नागरी वस्तीतून साप पकडून जंगलात सोडण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचप्रमाणे अनेक जखमी पक्षी- प्राणी यांना जीवदान दिलेले आहे. वन्यजीवांना जीवदान देताना फॉनच्या जयवंत ठाकूर या सर्पमित्राला तीन वेळा विषारी सापाने दंश केले होते. तसेच मे २०११ ला करंजा येथे आलेल्या बिबटय़ाला वाचविताना बिबटय़ानेही त्याला जखमी केले होते. अशाही स्थितीत जयवंतने आपले काम सुरूच ठेवलेले आहे. उरणमधील व्यवसायाने पेंटर असलेल्या रघू नागवेकर या सर्पमित्राने जखमी किंग कोब्रा (नागाला) दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडून दिले. चिर्ले येथील आनंद मढवी या सर्पमित्रानेही अनेक वन्यजीवांना जीवनदान दिले आहे. राजू मुंबईकर हेही रानसई परिसरात निसर्ग संरक्षणाचे काम करीत आहेत.