गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी येथील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख पर्यावरणस्नेही पिशव्यांचे वाटप गणेशभक्तांना केले जाणार आहे. या पिशव्यांच्या वितरणाचा शुभारंभ गुरुवारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत झाला.
शहरात सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी असे एकूण किमान दोन लाख श्रीगणेश मूर्तीची स्थापना केली जाते. उत्सवात दररोज फुलांच्या माळा, दुर्वा, पत्री, जास्वंदीची फुले, नैवेद्य अशा विविध साहित्यांचा वापर केला जातो. यामुळे दहा दिवसांत प्रत्येक घरात मोठय़ा प्रमाणात निर्माल्य साठते आणि विसर्जनाच्या दिवशी हे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून गोदावरीत विसर्जित केले जाते. यामुळे गोदावरी नदी मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित होते. गोदावरीच्या प्रवाहात ठिकठिकाणी या प्लास्टिकच्या पिशव्या अडकून अवरोध निर्माण करतात. हे रोखण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशभक्तांना पर्यावरणस्नेही पिशव्यांचे वितरण केले जात आहे.  नागरिकांनी निर्माल्य  पिशवींमध्ये संकलित करून विसर्जनाच्या दिवशी ते ऊर्जा निर्माल्य पिशवीत टाकावे, असे आवाहन बोरस्ते यांनी केले.  
उत्साहात कळत-नकळत आपल्याकडून ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण तर होत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. गोदावरीचे प्रदूषण रोखणे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असेही प्रतिष्ठानने म्हटले आहे. विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलित करण्याची व्यवस्था चोपडा लॉन्स, गंगापूर रस्ता, घारपुरे घाट, नवश्या गणपती, इंद्रप्रस्थ पुलाजवळ करण्यात आली आहे. निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याचा योग्य आणि नैसर्गिक पद्धतीने विनियोग केला जाईल, असे बोरस्ते यांनी सांगितले. पर्यावरणस्नेही निर्माल्य पिशवीच्या वितरणाप्रसंगी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे, उपमहानगरप्रमुख संतोष कहार, अनिल पाटील आदी उपस्थित होते.