प्रदूषणात नेहमी अग्रेसर व आता कच्चा माल नसल्यामुळे बंद असलेल्या ताडाळी औद्योगिक वसाहतीतील पाच उद्योगांची पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी आज पाहणी केली. पर्यावरणमंत्र्यांचा बंद उद्योगातील प्रदूषणाच्या पाहणीचा दौरा उद्योगांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेला हा जिल्हा प्रदूषणात देशात चौथ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्य़ाचे रहिवासी असलेले संजय देवतळे स्वत: पालकमंत्री व राज्याचे पर्यावरणमंत्री असतांना चंद्रपूर प्रदूषणात आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री व पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी नुकतीच देवतळे यांच्यावर तशी टीकाही केली होती. त्यामुळे पर्यावरणमंत्री या नात्याने उद्योगांचे प्रदूषण कमी करण्याची नैतिक जबाबदारी त्यांची आहे. मात्र, त्यांनी या दृष्टीने कधीच प्रयत्न केले नाही. त्याचा परिणाम उद्योगांचे प्रदूषण आणखीच वाढले. बल्लारपूर पेपर मिल, सिमेंट उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, पोलाद उद्योग व वीज प्रकल्पांमुळे या प्रदूषणात आणखीच भर पडली आहे. पर्यावरणमंत्री या नात्याने प्रदूषणाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याची जबाबदारी त्यांची आहे. या उद्योगांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याऐवजी ते या उद्योगांकडे फिरकले सुध्दा नाहीत. परंतु, आता अचानक पर्यावरणमंत्री देवतळे जागृत झाले आहेत. गुरुवार व शुक्रवार, असे सलग दोन दिवस त्यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यातील बंद असलेल्या पोलाद उद्योग व खासगी वीज प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्योगांच्या अडचणी जाणून घेतांनाच प्रदूषण कमी करण्याच्या सूचना उद्योगांच्या व्यवस्थापनाला दिल्या.
वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर, जीएमआर पॉवर या नव्या येऊ घातलेल्या उद्योगांची पाहणी केली, तर आज ताडाळी औद्योगिक वसाहतीतील धारीवाल प्रकल्प, गोपानी, सिध्दबली, ग्रेस व चमण मेटालिक या पोलाद उद्योगांना भेट देऊन त्यांची पाहणी केली. विशेष म्हणजे, ताडाळी वसाहतीतील पाचही उद्योग कच्चा माल मिळत नसल्यामुळे दीड ते दोन वर्षांपासून बंद आहेत. पालकमंत्र्यांनी या उद्योगाला भेट देऊन कच्चा माल किती दिवसांपासून मिळत नाही, उद्योग का बंद पडले आहेत, तेथील कामगारांच्या समस्या, तसेच उद्योग कधी सुरू होणार, याची माहिती व्यवस्थापनाकडून जाणून घेतली.
हे पाचही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू असतांना प्रदूषणात आघाडीवर होते. गोपानी, ग्रेस व चमण मेटालिक या पोलाद उद्योगांना तर सर्वाधिक प्रदूषण करीत असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कित्येकदा दंड ठोठावला. या उद्योगांच्या प्रदूषणामुळे ताडाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी उजाड झाल्या आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी तेव्हा पर्यावरणमंत्री व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे शेकडो तक्रारी केल्या. परंतु, या तक्रारींची साधी दखल सुध्दा प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरणमंत्र्यांनी घेतली नाही. आता हेच प्रदूषण करणारे उद्योग कच्चा माल मिळत नसल्यामुळे बंद पडल्यानंतर पर्यावरणमंत्री देवतळे यांनी उद्योगांना भेटी देऊन प्रदूषणाची पाहणी केली. पर्यावरणमंत्री उद्योगांची पाहणी करणार असल्याची माहिती व्यवस्थापनाला तीन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे या पाचही उद्योगांनी रस्त्यांपासून रंगरंगोटी व सर्व प्रकारची तयारी करून ठेवली होती. त्यामुळे पर्यावरणमंत्र्यांना उद्योगात सर्व काही आलबेल दिसले असले तरी बंद उद्योग प्रदूषण करणार कुठून, हा प्रश्न त्यांनाही पडला नाही. पर्यावरणमंत्र्यांचा बंद उद्योगातील प्रदूषणाचा पाहणी दौरा उद्योगाच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या पाहणी दौऱ्यात त्यांना अजिबात प्रदूषण दिसले नाही, असे त्यांचे सहकारी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगत होते.