ईपीएस अंतर्गत पाच हजार रुपये पेंशन व महागाई भत्ता देण्याबाबत केंद्र शासनाने दखल घेतली असून ईपीएस कृती समितीने आभार मानले आहेत.
संपूर्ण देशात १८३ प्रतिष्ठान व निमसरकारी कार्यालये राज्य वीज मंडळ, मार्ग वाहतूक महामंडळ, जिल्हा सहकारी बँका, खासगी बँक, एमईएल, राज्य व केंद्राच्या निमसरकारी प्रतिष्ठानात २५ ते ४० वर्षे सेवा केल्यानंतर देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या व घाम गाळणाऱ्या कामगारांना कमीत कमी पाच हजार रुपये पेंशन, महागाई भत्ता देण्याची मागणीची नोंद घेतल्याने ईपीएस कृती समितीतर्फे स्वागत करण्यात आले आहे.
समितीच्या सदस्यांनी यापूर्वी उपराष्ट्रपती हमीद अंसारी, भाजपच्या ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, खासदार प्रकाश जावडेकर आणि हंसराज अहीर यांची २०१३ मध्ये भेट घेतली. ईपीएस ९५ कृती समितीद्वारे उपराष्ट्रपती व कामगार मंत्री ऑस्कर फर्नाडिस यांच्याशी चर्चा करून पेंशनमध्ये वाढ व महागाई भत्ता जोडून वैद्यकीय सुविधा देण्याची विनंती केली होती. नुकतेच केंद्र शासनाच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे रेवतकर यांना कमीत कमी पाच हजार रुपये दरमहा पेंशन करणार असल्याचे समितीला कळवण्यात आले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव पेंशन व महागाई भत्ता देण्याची प्रक्रिया सोपी झाली असून ‘अच्छे दिन आये है’ याचा आनंद समितीने व्यक्त केला आहे. पेंशनधारकांची सभा लवकरच नागपुरात आयोजित करणार असल्याचे इपीएस समितीचे अध्यक्ष सुरेश रेवतकर यांनी कळवले आहे.
नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार मेळावा
 विदर्भातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आयोजित करण्याबाबतचा ठराव ईपीएस ९५ पेंशनर्स समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या मेळाव्याची तारीख लवकरच निश्चित करण्यात येईल. तसेच राज्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार मेळावा पुण्यात आयोजित करण्यात येईल. नागपुरात देशव्यापी महासंमेलन आयोजित करण्याबातचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आले, अशी माहिती समितीचे महासचिव प्रकाश पाठक यांनी निवेदनातून दिली.