सिंचन घोटाळा आणि पाण्याच्या समन्यायी वाटपाबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप हे विरोधक दोघेही जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. सिंचन घोटाळ्याबद्दल युतीच्या नेत्यांचे मौन तसेच पाण्याच्या समन्यायी वाटपाबद्दलही युतीची बोटचेपी भूमिका या प्रकाराबद्दल मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चात जोरदार टीका करण्यात आली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे सरचिटणीस अशोक ढवळे यांच्यासह विलास बाबर, विजय गाभणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी देशोधडीला लागला असून सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या माध्यमातून जनतेला लुबाडण्याचे काम सुरू केले आहे. यावर शिवसेना-भाजपाच्या पुढाऱ्यांचे मौन आहे. महाराष्ट्रात आजारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रक्रियेतही आघाडीच्या गरव्यवहाराला युतीची मूक संमती आहे. जनतेच्या प्रश्नावर या सर्वाचीच भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका यावेळी माकपचे  अशोक ढवळे यांनी केली. सद्यस्थितीत कापसाला सात हजार रुपये प्रतििक्वटल भाव देण्यात यावा अन्यथा सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही मोर्चातून देण्यात आला.       
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मनरेगा अतंर्गत शेत रस्ते, विहिरी, पाझर तलाव आदी कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच जायकवाडीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. येथील मोंढा परिसरातून निघालेला हा मोर्चा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आला आणि मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.