इथेनॉलचे धोरण राबविल्यास शेतकऱ्याला उसापासून, मक्यापासून, खराब झालेले धान्य, फळे, ओला कचरा यापासून उत्पादन खर्चाबरोबरच ७० टक्के नफा सहज मिळू शकेल. यासाठी इथेनॉलचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात व्हावे, यासाठी २४ सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी राज्यव्यापी इथेनॉल परिषदेचे आयोजन केल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.    
जैवइंधन संघटना व शेतकरी सहकारी संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले,की साखर दरावरून ऊस दरासाठी आपण गेली ४० वर्षे साखर कारखान्यांशी भांडत राहिलो. ते त्या वेळी योग्य होते. आता पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत. त्यामुळे आपण इथेनॉलशी लढले पाहिजे. इथेनॉल हे इंधन उसापासून तयार होते. ते पेट्रोलप्रमाणे दोन चाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांसाठी इंधन म्हणून जगात वापरले जाते. आता उसदरासाठी आमचेच उसाचे ट्रक, ट्रॅक्टर अडविण्याचे कारण नाही. पेट्रोलियम कंपन्या आणि शासनाशी आमचा संघर्ष आहे. हे धोरण राबविले तर उसाचा दर वाढेल. शेतक ऱ्याला उसाचे एकरकमी पैसे मिळतील. कारखान्यांना रोज इथेनॉल विकून पैसे मिळतील. स्टॉक,स्टोअरेज, कर्ज, व्याज हे कारखान्यांचे प्रश्न निकालात निघतील. यासाठी करावा लागणारा लढा राज्यव्यापी इथेनॉल परिषदेच्या वेळी जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी शिवाजी माळकर, अॅड.अजित पाटील, बापूसाहेब चिचणीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.