दोन दिवसांपूर्वी मुंबईत ट्रकमध्ये सापडलेली शेकडोची रोकड, दागदागिने, हिरे आदीची कुरियरद्वारे होणारी वाहतूक हा प्रकार नवीन नाही. सर्वसामान्यांना याची माहिती नसल्याने त्यांना आश्चर्य वाटते. राज्यातील अन्य प्रमुख शहरांमधूनही अशाच पध्दतीने कुरियरच्या माध्यमातून व्यापारी व्यवहार करतात. एकटय़ा संगमनेरमधून दररोज एक ते दोन कोटीची देवाण घेवाण होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यावसायिकानेच याबाबतची सविस्तर माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. पूर्वी छोटय़ा शहरात स्थानिक पातळीवर अनेक वस्तू तयार होत असत. कलाकुसर केलेले दागिने, रेडीमेड कपडे व अनेक रेडिमेड वस्तू स्थानिक पातळीवर तयार व्हायच्या. आता कुशल कारागिर राहिले नाहीत. शिवाय यांत्रिकीकरण आल्याने अशा वस्तू मोठमोठय़ा कारखान्यात तयार होतात. त्यामुळे आता रेडिमेड वस्तू मोठय़ा शहरातून आयात-निर्यात कराव्या लागतात. स्पर्धा आणि वेगवान जगात यामध्ये वेळ दवडणे व्यापाऱ्यांना परवडणारे नसते. त्यामुळे अशा प्रकारचा कुरियर व्यवसाय तेजीत आला. त्यातून विशेषत: रोकड, कलाकुसरीचे दागिने, पैलू पाडलेले हिरे आदींची देवाणघेवाण होते. काही व्यापारी करचुकवेगिरीसाठीही कुरियरच्या माध्यमातून व्यवहार करतात. पर्यायाने अशी कुरियर सेवा देणारे व्यावसायिकही तयार झाले.
हे सर्व कुरियर व्यावसायिक मुंबईतील एका बडय़ा कुरियर कंपनीशी जोडलेले आहेत. पार्सल मर्यादित असेल तर खासगी आरामबसच्या माध्यमातून कुरियरद्वारा ते इतर शहरात पाठविले जाते. मोठी उलाढाल असेल तर मात्र, स्वतंत्र वाहन वापरण्याची पध्दत आहे. अशीच वाहने मुंबईत पकडली गेल्याची शक्यता संबंधिताने व्यक्त केली. शिवाय राज्यातल्या अनेक शहरातून याच पध्दतीने देवाण घेवाण चालते असेही त्याने अधोरेखित केले. नेहमीप्रमाणे मांडवली झाली नसल्याने हा प्रकार उघडकीस आणला असावा असेही त्याने स्वत:चे मत मांडले. एकटय़ा संगमनेरमधून दररोज एक ते दोन कोटीची रोकड अथवा दागदागिन्यांच्या माध्यमातून कुरिअरने व्यवहार होत असल्याची आश्चर्यकारक माहिती त्याने दिली.