’ गिर्यारोहकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी
’ मोहिमेची चित्रफीतही पाहायला मिळणार
जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करण्याचा मान मिळविणाऱ्या भारतीय पथकाच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेला २३ मे रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने २३ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि इंडियन माउंटनिअिरग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेत सहभागी झालेल्या गिर्यारोहकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि चित्रफितीद्वारे या मोहिमेचा थरार अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
कॅप्टन एम. एस. कोहली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १९६५ मध्ये २० हजार ३५ फुटांवरील एव्हरेस्टचे शिखर सर केले होते. या पथकात सोनम व्यांगाल, सी. पी. व्होरा, ब्रिगेडियर मुल्कराज, बांगू यांचा समावेश होता. दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत.
उणे ३० ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनचा अभाव असलेले विरळ वातावरण, चढाईच्या मार्गावरील धोके, आधुनिक साधनसामग्रीचा अभाव असतानाही भारतीय पथकाने ही मोहीम फत्ते केली होती. नेपाळचे राजे महेंद्र विक्रम, तेव्हाचे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण आदींनी या पथकाचा गौरव केला होता. १९६६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हे पथक सहभागी झाले होते.
वयाची ८० वर्षे उलटलेले कोहली गिर्यारोहणात आजही सक्रिय आहेत. सोनम व्यांगाल लेह, कारगील येथील गिर्यारोहण मोहिमेत सहभागी होतात. एव्हरेस्ट मोहिमेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारकाने केले आहे.