‘गिरिप्रेमी’तर्फे एव्हरेस्ट मोहिमेतील छायाचित्रांचे आणि गिर्यारोहण साधनसामुग्रीचे ‘करेज’ हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तुसंग्रहालयामध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन २० जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, एव्हरेस्ट मोहिमेचे नेते उमेश झिरपे, अभय गाडगीळ आदी उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये एव्हरेस्ट शिखराची सहसा बघायला न मिळणारी अशी १०० हून अधिक छायाचित्रे आहेत. यामध्ये शिखराचे रौद्र तसेच मनमोहक रूप दाखवणाऱ्या छायाचित्रांचाही समावेश आहे.
त्याचप्रमाणे हिमालयातील अतिउंचीवर वापरण्यात येणारी साधनसामुग्रीही येथे मांडण्यात आली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन मास्क, डाऊन सूट, क्रँपॉन्स, तंबू आणि आईस अ‍ॅक्स यांसारखी सुमारे ३० साधने पुणेकरांना बघता येणार आहेत. तसेच गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी नेपाळमधील गोरक्षेप येथे शिवाजीमहाराजांचा पुतळा प्रस्थापित केला होता, त्या पुतळ्याची प्रतिकृती या ठिकाणी पहायला मिळणार आहे.