मुस्लीम बांधवासाठी रमजानचा पवित्र महिना हा शांती आणि सहनशीलतेचा मार्ग दाखविणारा असून जगातील सर्वच धर्म हे विश्वशांती आणि माणुसकीची शिकवण देणारे असल्याचे मत नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
उरण पोलिसांच्या वतीने सिटिझन हायस्कूल येथे गुरुवारी आयोजित केलेल्या रमजानच्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही उरण पोलिसांच्या वतीने रोजा ए इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल परिमंडळ २चे उपायुक्त विश्वास पांढरेही उपस्थित होते. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व गुन्हे विभागाचे निरीक्षक अभय महाजन यांनी सर्वाचे स्वागत केले. इफ्तारच्या वेळी उरणमधील जनतेच्या वतीने मुस्लीम समाजाला रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गेली अनेक वर्षे उरणमधील सर्व धर्म व समाज एकजुटीने गुण्यागोविंदाने नांदत असल्याचा उल्लेख करण्यात आला. या वेळी चव्हाण यांनी सर्वधर्मसमभाव, माणुसकी, शांतता व आदर याविषयी आपली मते मांडून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.