‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असा गाजावाजा केला जात असला व पूर्वीपेक्षा रक्तदानाचे प्रमाण वाढले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला लागेल एवढे रक्त जमा होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्याला दरवर्षी १२ लाख रक्त पिशव्यांची गरज असताना फक्त ९ ते १० लाख पिशव्या गोळा होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील ११ कोटी २४ लाख लोकसंख्येतील किमान १२ ते १३ लाख लोकांनी दरवर्षी किमान एकदा रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन रक्तदान चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
भारतात १ कोटी २० लाख रक्त पिशव्यांची आवश्यकता असताना फक्त ७५ ते ८० लाखच रक्त पिशव्या गोळा होतात. पाहिजे त्या प्रमाणात रक्त गोळा होत नसल्याने भारतात मृत्यूचे प्रमाण १५ ते २० टक्के असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीष वरभे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. साधारणत: १८ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते. यासाठी रक्तदात्याचे वजन किमान ४५ किलो असणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीच्या शरीरात ४.५ ते ५ लिटर रक्त असते. रक्तदान करताना त्यातील फक्त ३५० किंवा ४५० मि.ली. रक्त काढल्या जाते. आज जगात अनेक शोध लागले असले तरी रक्त तयार करण्याचा कारखाना तयार होऊ शकला नाही. शासकीय पातळीवर रक्तदानाविषयी जागृती केली जात असली तरी, त्या प्रमाणात रक्तदाते सामोर येत नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत: तीन महिन्यानंतर त्याला रक्तदान करता येते. मधुमेह, कावीळ, एचआयव्ही असलेल्यांनी रक्तदान करू नये. रक्तदान करताना शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर शरीरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. भारतात २ हजार ७५० रक्तपेढय़ा असून महाराष्ट्रात २८२, तर नागपूर शहरात १४ रक्तपेढय़ा आहेत. या रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जात असला तरी रक्ताची फारच कमतरता भासत आहे. रक्ताच्या अभावामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. वरभे यांनी यानिमित्त केले.
रक्तदान हे जगातील कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे आणि माणूस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम करते. तरीही एक टक्के लोकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता असताना देशात फक्त ०.६ ते ०.७ टक्केच लोक रक्तदान करतात. दरवर्षी हे प्रमाण कमीअधिक होत असते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रक्तदानाचे प्रमाण ०.७ ते ०.८ टक्के एवढे आहे. अचानक रक्तस्त्राव होणे, शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्त्राव, रक्ताचा कर्करोग व अपघातात रक्तस्त्राव झाल्यास रक्त देण्याची गरज भासते. हिमोफिलिया व थॅलेसिमिया आजार असणाऱ्या रुग्णांना तर वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताने फक्त रक्ताची नातीच जोडली जात नाहीत, तर या रक्तामुळे एखाद्याला जीवनदान मिळू शकतो. म्हणूनच रक्ताच्या किमतीचे मोजमाप कशातच होऊ शकत नाही. त्यामुळे ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ मानून प्रत्येकाने वर्षांतून एकदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन साईनाथ ब्लड बँकेचे संचालक डॉ. गणेश खंडेलवाल यांनी केले.
ऐच्छिक व व्यावसायिक असे रक्तदात्याचे दोन प्रकार असून ८५ ते ९० टक्के रक्त हे ऐच्छिक रक्तदात्याकडून प्राप्त होते, तर १० ते १५ टक्के रक्त व्यावसायिक रक्तदात्याकडून प्राप्त होते. महाराष्ट्रात २०१० मध्ये १२ लाख रक्ताच्या पिशव्या गोळा झाल्या होत्या. हा एक राज्याचा उच्चांक स्थापन झाला होता. त्यानंतर मात्र हे प्रमाण कमी होऊ लागले असून ते १० लाखावरच आले आहे. रक्ताच्या गरजेचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत असताना रक्तदाते कमी मिळत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
रक्तदान करणे हे आपले एक कर्तव्य समजून प्रत्येकाने वर्षांतून किमान एकदा रक्तदान केले तरी महाराष्ट्रात रक्ताअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रक्तदानासाठी आवाहन
नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार तर ग्रामीणची २२ लाख ४८ हजार एवढी असून नागपूर जिल्ह्य़ाची एकूण लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार एवढी आहे. एवढय़ा लोकसंख्येसाठी दरवर्षी ४६ ते ४७ हजार रक्त पिशव्यांची गरज आहे. परंतु ३५ ते ३७ हजार रक्तपिशव्या गोळ्या होत आहेत. आणखी ९ ते १० हजार रक्त पिशव्यांची गरज नागपूरला आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकटय़ा मेडिकलमध्ये एका वर्षांला १५ हजार रक्त पिशव्यांची गरज भासते. परंतु मेडिकलमधील रक्तपेढीतर्फे १० ते १२ हजारच रक्त पिशव्या गोळ्या होतात. तेव्हा जास्तीत जास्त रक्तदात्यांनी मेडिकलमध्ये येऊन रक्तदान करून गरीब रुग्णांचे प्राण वाचवावे, असे कळकळीचे आवाहन मेडिकलमधील आदर्श रक्तपेढीचे संचालक डॉ. संजय पराते यांनी जागतिक रक्तदान दिनानिमित्त केले आहे.