निर्बीजीकरण प्रक्रिया नीट राबवली जात नसल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून श्वानदंशाचे प्रकारही वाढले आहेत. ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे भेडसाविणाऱ्या समस्यांबाबत सातत्याने आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत शहा यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नावर महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात दरदिवशी किमान दहाजणांना श्वानदंश होत असल्याचे दिसून आले आहे.
१ जानेवारी २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या १६ महिन्यांच्या काळात ठाणे शहरात तब्बल चार हजार श्वानदंशाच्या घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत मुंब्रा परिसरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला चढविल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची निविदा मध्यंतरी रखडल्याने हा उपद्रव आणखी वाढला होता. ठाणे महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांना पकडण्यासााठी अवघी एक व्हॅन उपलब्ध आहे. कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आणखी नवी वाहने विकत घेण्याचा प्रस्ताव आयुक्त असीम गुप्ता यांनी मांडला होता. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याची अप्रत्यक्ष कबुलीच मध्यंतरी आयुक्तांना द्यावी लागली होती.  
श्वानदंशाचा आकडा वाढताच
सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत शहा यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा या आकडेवारीत समावेश नाही. तसेच या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी सत्यजीत शहा यांनी मे महिन्यात महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता काही आरोग्य केंद्रांमधून अद्याप आकडेवारी येणे बाकी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे श्वानदंश झालेल्या ठाणेकरांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता शहा यांनी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरातील नागरिकांना रात्री-अपरात्री रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. त्यातही विशेषत: महिला, मुले आणि वृद्ध नागरिकांना त्यांचा जास्त त्रास होतो. मुंब्रा परिसरातील कचराकुंडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मांस आढळून येत असल्याने या भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणखी वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे कुत्र्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रहिवाशांनी पुढाकार घेऊन स्वच्छता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.