बारावीच्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेले वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, विद्यार्थी पालकांनी तेच ग्राहय़ धरावे, असे स्पष्टीकरण मंडळाने दिले आहे. गेल्या काही दिवसापासून शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालकाच्या असहकार आंदोलनामुळे बारावीचे वेळापत्रक बदलविण्यात आल्याचे सांगितले जात होते मात्र वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नसून शिक्षण मंडळाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे मंडळाच्या ६६६.े२ु२ँ२ी.ूं.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याशिवाय अन्य खासगी संस्थांनीसुद्धा वेळापत्रके जाहीर केली आहेत. त्या वेळापत्रकांमध्ये दिनांक, वेळ इत्यादींबाबत त्रुटी असल्याच्या विद्यार्थी, पालकांनी मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात मंडळाने स्पष्टीकरण दिले. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रकच योग्य असून, अन्य खासगी संकेतस्थळावरील वेळापत्रकांशी मंडळाचा काही संबंध नाही. मंडळाच्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.