मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या फेररचनेत प्रकाश सोळंके यांची गच्छन्ती झाली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची गटबाजी संपविण्यासाठी सोळंके यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीतील गटबाजीचे समूळ उच्चाटन करण्यात सोळंके यांना अपयश तर आलेच; परंतु राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांशी घेतलेले वैरही त्यांचे मंत्रिपद घालविण्यास कारणीभूत ठरले. पालकत्व निभावण्याच्या कसरतीत सोळंके यांना अखेर लाल दिवाच गमवावा लागला.
खान यांच्याकडे पालकमंत्रिपद होते, त्यावेळी हे पालकत्व काढून

फौजिया खान

घेण्यासाठी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी असे सर्वच एकत्र आले होते. खान यांच्या विरोधात जिल्ह्यातले सगळेच नेते एकवटल्याने पक्षाने शेजारच्या बीड जिल्ह्य़ातील सोळंके यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा सोपविली होती. पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर सोळंके राष्ट्रवादीतील सर्व गटबाजी मिटवून सर्वाना एका सूत्रात बांधतील, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सोळंके यांनी जबाबदारी स्वीकारताच खान यांच्याशी वैर घेणे सुरू केले. खान यांनी पालकमंत्री असताना ‘व्हिजन २०२०’ ही संकल्पना मांडली. यातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रारूप त्यांनी निश्चित केले. पालकमंत्री सोळंके यांनी पहिल्याच बैठकीत या व्हिजनला विरोध केला. आपण धडाकेबाज पद्धतीने काम करतो. विकास करायचा असेल तर त्यासाठी निधी लागतो. नुसते कागदावर व्हिजन मांडून चालत नाही. व्हिजन काहीही असले तरी त्यासाठी पैसा लागतो, असे वक्तव्ये करताना ‘व्हिजन २०२०’ वरून सोळंके यांनी खान यांची खिल्ली उडवली. त्याच वेळी खान व सोळंके यांच्यातील सुप्त संघर्षांची कल्पना आली होती. त्यापुढच्या एक-दोन बैठकांमध्येही सोळंके व खान यांचे बैठकीतच खटके उडाले. सुरुवातीला राष्ट्रवादीतली गटबाजी थोपविण्याऐवजी खान यांच्याविरोधी पवित्रा पालकमंत्र्यांनी घेतला.
दुसरीकडे सोळंके यांचा जिल्ह्यातील सर्वच आमदारांशी निधीवरून संघर्ष सुरू झाला. संजय जाधव, सीताराम घनदाट, मीरा रेंगे व रामप्रसाद बोर्डीकर या चारही आमदारांशी सोळंके यांचे जमले नाही. निधीवाटपात पालकमंत्री आडकाठी आणत आहेत, असा आरोप आमदारांनी केला. मात्र, पाथरीतील जाहीर कार्यक्रमात सोळंके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. विकासकामे करण्यासाठी ‘अक्कल’ लागते, या शब्दांत त्यांनी जिल्ह्यातल्या आमदारांवर तोफ डागली होती. पालकमंत्री सोळंके यांच्याविरुद्ध त्यावेळी यातल्या काही आमदारांनी विधानसभेत टीकाही केली होती. जिल्ह्यातली पालकमंत्र्यांची कारकीर्द अशी वादग्रस्त ठरू लागली होती.
राष्ट्रवादीतील पवार काका-पुतण्याच्या छुप्या संघर्षांत थोरल्या पवारांची सहानुभूती खान यांच्या बाजूने, तर धाकल्या पवारांचा वरदहस्त सोळंके यांच्यावर, अशी स्थिती होती. खान यांच्या अभियानाचा समारोप करण्यास आलेल्या पवारांनी पालकमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले होते. परंतु पालकमंत्र्यांनी जिल्हाध्यक्ष भांबळे यांचे नाव घेतले होते. त्यावर पक्षाने महिलेला उमेदवारी द्यायची तरी कोणत्या मतदारसंघातून, असा प्रतिप्रश्न पवारांनी पालकमंत्र्यांना केला होता. थोरले पवार व सोळंके यांच्यात असे अंतर पडत चालले होते. राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या फेरपालटात आपला शब्द अंतिम आहे, हे थोरल्या पवारांनी दाखवून दिले. राजकीय जाणकारांनी पवारांचा फेरपालटाचा निर्णय भाकरी फिरवणारा असल्याचे निष्कर्ष काढले. मात्र, पवारांना केवळ भाकरीच फिरवायची नव्हती तर तवाही आपल्या मालकीचा आहे, हे सिद्ध करायचे होते. या प्रकारात सोळंके यांचे मंत्रिपद गेले.
जिल्ह्यात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीला उतारा म्हणून सोळंके यांना पालकत्व देण्यात आले खरे. मात्र, हे पालकत्व त्यांना निभावता

प्रकाश सोळंके

आले नाही. सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या गच्छंतीने खान यांचे प्रभुत्व पुन्हा सिद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेच्या उमेदवार म्हणून खान यांच्या नावाची चर्चा असली, तरी ही चर्चा जास्त गावपातळीपर्यंत नेण्यात वरपुडकर गटाचा मोठा वाटा होता. खान यांनी राबवलेले शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण अभियान कार्यक्रम या संपर्काचाच भाग होते. आता सरपंच परिषद घेऊन खान यांचा आणखी लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात राजकारणाची समीकरणे बदलली, तर खान यांच्याकडे पुन्हा पालकत्व येऊ शकते. पालकमंत्रिपद गेल्याने जिल्ह्यातल्या प्रशासकीय यंत्रणेवर सैल झालेली खान यांची पकड पुन्हा पालकमंत्रिपदाच्या रूपाने कायम झाली, तर जिल्ह्यात राजकारणाचे वारे आणखी वाहू लागेल. अशा वेळी जिल्ह्यातला राष्ट्रवादीत सदैव चालणारा ‘प्रासंगिक करार’ कशा पद्धतीने वळण घेतो आणि भविष्यात कोण कोणासोबत राहतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.