तीन डब्यांच्या छोटय़ा रेल्वेगाडीपासून पंधरा डब्यांच्या मोठय़ा लोकल पर्यंतची पश्चिम रेल्वेची गेल्या दीडशे वर्षांतील वाटचाल चर्चगेट स्थानकावर प्रदर्शनाच्या रुपात मांडण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेमार्गावर म्हणजेच ‘बॉम्बे बडोदा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया’ या मार्गावर धावलेल्या पहिल्या रेल्वेगाडीला दीडशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पश्चिम रेल्वेतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार (२९ नोव्हेंबर)पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा थेट कुलाब्यापर्यंत धावत होत्या. त्या वेळी ओव्हल मैदानाच्या बाजूला असलेले रेल्वेचे रूळ, त्याच्या बाजूने वाहणारा समुद्र आदींची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. त्याशिवाय मोरारजी देसाई यांच्या हस्ते चर्चगेट स्थानकाचे भूमीपूजन करण्यासाठी वापरण्यात आलेले चांदीचे खुरपे, काही डब्यांची मिनिएचर मॉडेल्स, चालत्या इंजिनाचे मिनिएचर मॉडेल अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनातील खास गोष्ट म्हणजे पश्चिम रेल्वेने प्रवास केलेल्या काही थोर व्यक्तींची छायाचित्रे! यात तत्कालिन महाव्यवस्थापकांबरोबर रेल्वेप्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जॅकलिन केनेडी यांचे छायाचित्र आहे. त्याशिवाय पश्चिम रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणारे पंडित नेहरू, आगा खान, लाल बहादुर शास्त्री असे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत.