News Flash

ऐतिहासिक नाण्यांचा खजिना उद्यापासून खुला

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त टांकसाळीतून पाडण्यात आलेले ‘सुवर्ण होन’, मराठय़ांच्या नाशिकच्या नाण्यांवर असणारा जरीपटका तर चांदवडच्या नाण्यांवरील तुरा आणि इतकेच नव्हे तर, मुल्हेरच्या नाण्यावर आढळून येणारी

| March 27, 2014 11:40 am

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त टांकसाळीतून पाडण्यात आलेले ‘सुवर्ण होन’, मराठय़ांच्या नाशिकच्या नाण्यांवर असणारा जरीपटका तर चांदवडच्या नाण्यांवरील तुरा आणि इतकेच नव्हे तर, मुल्हेरच्या नाण्यावर आढळून येणारी शिवपिंड.. दुर्मीळ व प्राचीन नाण्यांची अशी वेगवेगळी खासीयत नाशिकच्या कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटीक अ‍ॅण्ड रेअर आयटेम्स संस्थेमार्फत आयोजित ‘रेअर फेअर २०१४’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडली जाणार आहे. मध्ययुगीन, इस्लामिक, शिवशाही तसेच ब्रिटीश इंडियाच्या काळातील सुवर्ण, रौप्य व तांब्याची नाणी व भारत स्वतंत्र झाल्यावर काढलेली नाणी या प्रदर्शनात पहावयास मिळतील. या व्यतिरिक्त संस्थेचे सभासद व अन्य काही संग्राहकांच्या दुर्मीळ वस्तु, पोष्टाची तिकीटे आदींचे निरीक्षण करता येणार आहे.
२८ ते ३० मार्च या कालावधीत गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात सकाळी दहा ते रात्री आठ या कालावधीत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात इस. २००० वर्षे आणि त्यापेक्षा जुनी नाणी मांडण्यात येणार आहेत. या माध्यमातून नाण्यांचा रोचक इतिहास उलगडून अभ्यास करण्याचीही संधी आहे. संग्रहात अतिशय दुर्मीळ नाणे म्हणजे शिवाजी महाराजांचे ‘सुवर्ण होन’. सोन्याचे असणारे हे नाणे २.८८ ग्रॅम वजनाचे आहे. या नाण्याचा वापर सुवर्णतुलेसाठी झाला होता. यानंतर मराठा राज्यात अनेक ठिकाणी होन काढले गेले असण्याची शक्यता आहे. नाशिकचे इस्लामी राजवटीतील नांव गुलशनाबाद होते. मुगल राजवटीतील राजांच्या चांदीच्या नाण्यांवर टांकसाळीचे नांव गुलशनाबाद उर्फ नासिक असे आढळून येते. पेशवाईच्या काळात नासिक, चांदवड व मुल्हेर या मुगलकाळापासून चालत आलेल्या टाकसाळी पुढेही सुरू राहिल्याचे लक्षात येते. चांदवडचे नांव होते जाफराबाद उर्फ चांदोर तर मुल्हेरचे नांव होते औरंगनगर. मराठय़ांच्या नासिकच्या नाण्यावर जरीपटका, चांदवडच्या नाण्यावर तुरा तर मुल्हेरच्या नाण्यावर शिवपिंडी आढळून येतात. नाशिकची नाणी प्रदर्शनास पहावयास मिळतील. ब्रिटीश इंडिया काळातील सुवर्ण, रौप्य व तांब्याची नाणी तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर काढलेली नाणी प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. भारत व इतर देशांनी काढलेली तिकीटेही बघावयास मिळतील.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती व संग्राहक के. के. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द नाणी संग्राहक किशोर चांडक उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात संग्राहकांना संग्रह व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने लागणारी सामग्री तसेच नाणे, तिकीटे व इतर साहित्य विकणारे सुमारे ४० विक्रेते देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी होणार आहेत. विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे सचिव अच्युत गुजराथी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 11:40 am

Web Title: exhibition of historical coins
Next Stories
1 खोदकामांमुळे वाहनधारकांचे हाल
2 पाणी व ऊर्जा बचत एकमेकांवर अवलंबून
3 जीवनदायी योजनेविषयी खासगी रुग्णालयांची अनास्था
Just Now!
X