सुलेखनकार अच्युत पालव यांनी आपल्या ३० वर्षांच्या सुलेखन कारकीर्दीत अनेक मान्यवर तसेच सर्वसामान्य व्यक्तींकडून प्रेरणा घेतली. या सर्व मंडळींनी पालव यांचे अनुभवविश्व आणि आयुष्य समृद्ध केले. या सर्व व्यक्तींना पालव ‘सूर्य’म्हणून संबोधतात. पालव यांना प्रेरणा देणाऱ्या या ‘सूर्या’वर त्यांनी रेखाटलेले प्रदर्शन येत्या १५ ऑक्टोबरपासून मुंबईत जहांगीर कलादालनात सुरू होत आहे.
२२ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे. या मंडळींविषयी असलेली कृतज्ञता आणि त्यांच्याप्रती आपली आदरांजली व्यक्त करण्यासाठी पालव यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासह किशोरी आमोणकर, गुलजार, सचिन तेंडुलकर, शंकर महादेवन, झाकीर हुसेन आदींचा समावेश आहे. या प्रत्येक व्यक्तीच्या शब्दातून, लयीतून, नादातून, रंगाच्या फटकाऱ्यातून आणि त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासातून पालव यांना जे काही मिळाले, ते या प्रदर्शनात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.