जागतिक चिमणी दिवसानिमित्त सिडकोतील मॉडर्न हायस्कूलमधील हरितसेना इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी लाकडी, पुठ्ठय़ाचे, पत्र्याच्या डब्याचे, वाळलेले शहाळे यांपासून चिमण्यांसाठी घरटी तयार करून परिसरातील नागरिकांना चिमण्या वाचविण्याचा संदेश दिला.
या उपक्रमात ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना हरितसेना मार्गदर्शक अनिल माळी यांचे मार्गदर्शन लाभले.  माळी यांनी सर्व विद्यार्थी व नागरिकांना उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अंगणात धान्याची चुरी व पसरट भांडय़ात पाणी ठेवण्याचे आवाहन केले.
चिमण्यांच्या घरटय़ाचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले होते. उत्कृष्ट घरटी तयार करणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गायधनी, शिक्षक डी. डी. अहिरे, सचिन कुमावत आदी कर्मचारी उपस्थित होते.