मोठा गाजावाजा केल्यानंतरही हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावरील प्रदर्शन गेल्या दोन दिवसांपासून ओकेबोकेच राहिले. सोमवारी दिवसभरात अवघ्या १५-२०जणांनी भेट दिली. मंगळवारीही निवडक मंडळी येऊन गेली. विधिमंडळाच्या वतीने शहरातील संत तुकाराम नाटय़गृहात आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सात कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती होती. अध्र्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळ येणार म्हणून उद्घाटन सत्रास गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र देऊन बोलविण्यात आले. ‘भाषणे ऐकण्याची नोकरी’ इमाने-इतबारे करून ते परतले. त्यानंतर प्रदर्शन पाहण्यास कोणीच नसल्याने राज्य सरकारच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
सिंचन, रोजगार हमीचे जनक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे, त्यांचे स्मरण करता यावे यासाठी विभागीय स्तरावर परिसंवाद व छायाचित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम ठरविण्यात आला. विधिमंडळाच्या प्रधान सचिवांपासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत गर्दीसाठी सरकारी निरोप धाडण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम म्हटल्यावर सुरक्षा पास हवाच, या पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे त्याची छपाई झाली. पास तयार करण्यासाठी यंत्रणेची बरीच धावपळ झाली. पण गर्दी जमेल का, या शंकेने प्रत्येकाला सुरक्षा पास देऊन सभागृहात पाठविण्यात आले. सभागृह भरल्याने अधिकाऱ्यांना हायसे वाटले. मात्र, याच कार्यक्रमात हक्काच्या पाण्यासाठी घोषणाबाजी झाल्याने यंत्रणेवर नवेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कार्यक्रम झाला आणि वसंतराव नाईक यांच्या छायाचित्रावरील प्रदर्शन तीन दिवस राहील, असे सांगण्यात आले. नव्या पिढीला माजी मुख्यमंत्री नाईक यांच्या कार्याचे महत्त्व समजावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. मात्र, प्रदर्शनाकडे कोणीच फिरकले नाही. प्रदर्शन लावणारी विधिमंडळातील मंडळी व पुस्तकांच्या विक्रीचे दालन सांभाळणारे लोकांची वाट पाहून वैतागून गेले. प्रदर्शनात ध्वनिचित्रफितही दिवसभर सुरू होती. ती पाहता यावी, यासाठी शुभ्र कापड अंथरेलेले कोच ठेवले होते. मात्र, ही ध्वनिचित्रफित सुरू असताना एखादाच प्रेक्षक तेथे असे. त्यामुळे प्रदर्शनाची जागाच चुकली, असा खुलासा उपस्थित कर्मचाऱ्यांनी केला.
एवढेच नाही, तर एका बाजूला बंजारा समाजाच्या पुस्तकांचे दालनही नंतर लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनाकडे ना कोणी वरिष्ठ अधिकारी फिरकले, ना नेते. किमान महाविद्यालयीन तरुणांना व शाळकरी मुलांना प्रदर्शन पाहण्याची सक्ती केली असती तरी गर्दी जमली असती, मात्र, तसे आदेशच काढले नसल्याने वसंतरावांवरील प्रदर्शन रिकामे रिकामेच राहिले.