शहर व परिसरात अनेक लोक वर्षांनुवर्षे भाडय़ाच्या घरात रहात आहेत. सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईच्या काळात या घटकाला स्वत:चे हक्काचे घर घेणे शक्य होत नाही. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सम्यक निवास हक्क परिषद अर्थात नियोजित मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाष मुंढे हे सातत्याने हक्काच्या घरांसाठी विविध योजना राबवित आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सभासदांची नोंदणी झालेली असून संस्थेने शासन निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची मागणी केलेली आहे. सहकारी गृहनिर्माण योजनेकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या महसुली जमिनी नाममात्र दराने देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु मागील पाच महिन्यापासून संस्थेने मागितलेल्या जमिनीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली अथवा करण्यात आलेली नाही, असे मुंढे यांचे म्हणणे आहे.