वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजना तडीस नेणे शक्य होत नसताना मुंबई महानगर प्रदेशात जगप्रसिद्ध ‘फॉम्युर्ला वन’ शर्यतीसाठीचा ट्रॅक बांधण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा अट्टहास कायम आहे. यापूर्वी सल्लागारांवर कोटय़वधी रुपये खर्च करूनही ‘फॉम्र्युला वन’च्या ट्रॅकसाठी जागा सापडत नसताना पुन्हा एकदा कोटय़वधी रुपये खर्चून सल्लागार नेमण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे.
मुंबई परिसरात ‘फॉम्र्युला वन’ शर्यतीचा ट्रॅक बांधण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे. काही वर्षांपासून महामंडळ त्यासाठी प्रयत्नशील आहे. हा ट्रॅक व्यावहारिकदृष्टय़ा फायदेशीर ठरण्यासाठी किमान ५०० ते ६०० एकर जागा आवश्यक आहे. आरंभी मुंबई शहर व आसपासच्या जागांचा त्यासाठी विचार झाला. पण पुरेशी जागा मिळणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर मुंबई महानगरालगतच्या परिसरात शोधाशोध सुरू झाली. इतर काही जागांसह मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्ये पनवेलच्या आसपास ट्रॅक बांधल्यास तो यशस्वी होईल असा विचार करून तेथील जागेबाबत चाचपणी झाली. पनवेल परिसरातील अडाई भागात महामंडळाकडे सुमारे १०० एकर जागा आहे. पण आसपासची ४५० ते ५०० एकर जागा घेणे हे मोठे आव्हान आहे. सल्लागारांकडून याबाबतचा अहवाल आला. सल्लागारांवर आठ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्ची पडली. काही काळ हा विषय बाजूला पडला.
आता पुन्हा एकदा फॉम्र्युला वन ट्रॅकचा विषय ऐरणीवर आणण्यात आला आहे. या ट्रॅकसाठी आर्थिक आराखडा तयार करून देणे व जागांबाबत सल्ला देण्यासाठी पुन्हा एक सल्लागार नेमण्याचा घाट राज्य रस्ते विकास महामंडळाने घातला आहे. मुळात लोकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणारे प्रकल्प राबवण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महामंडळाने हाती घेतलेले वरळी-हाजीअली सागरी सेतू, वाशी खाडीवरील पुलाचा विस्तार असे अनेक प्रकल्प तडीस नेणे महामंडळाला शक्य झालेले नाही. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व जुन्या महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रकल्पाला अद्याप सरकारची मंजुरी बाकी आहे. अशावेळी लोकांसाठी उपयुक्त प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याऐवजी ‘फॉम्र्युला वन ट्रॅक’सारख्या प्रकल्पांचा अट्टहास धरत त्यासाठी कोटय़वधी रुपये सल्लागारांवर खर्च करण्यात येत आहेत.