अनेक र्वष पालिकेच्या सेवेत कार्यरत राहूनही बढती न मिळणाऱ्या अनुभवी उपायुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अजय खानविलकर आणि न्या. के. के. तातेड यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे शासकीय सेवेतील आयुक्तपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली आहे.
‘बीपीएमसी’ कायद्यातील विसंगती, शासनाचा ४ मे २००६ चा अध्यादेश, बीपीएमसीमधील कलम ३६, ५०(२) यामधील संदिग्धता न्यायालयाने या निर्णयामुळे दूर केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे हे पालिकेतील उपायुक्त पदावर कार्यरत होते. त्यानंतर शासनाने सोनवणे यांना उल्हासनगर, जळगाव येथे आयुक्त म्हणून पाठविले. सोनवणे हे मुख्याधिकारी संवर्गातील असून त्यांची चुकीच्या पद्धतीने आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली आहे असा दावा करून सोनवणे यांच्या नियुक्तीला श्रीनिवास घाणेकर व इतरांनी उच्च न्यायालयात दोन वर्षांपूर्वी आव्हान दिले होते. ही याचिका निकाली काढताना न्यायालयाने उपायुक्तांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
पालिकेच्या आयुक्तपदी आतापर्यंत शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त केले जात. उपायुक्तपदी उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी नेमले जात होते. अधिकाऱ्यांची कमतरता जाणवू लागल्याने शासनाने ४ मे २००६ रोजी एक अध्यादेश काढून मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी हे ड वर्ग पालिका आयुक्तपदी नियुक्त केले जातील.
याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त हे पद निर्माण करण्यात येऊन गेले दीड वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनात पालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त संवर्ग निर्माण करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
‘बीपीएमसी’च्या कलम ३९ मध्ये सुधारणा करून शासनाने अतिरिक्त आयुक्त पदासाठी उपायुक्त संवर्गातील अधिकारी पात्र असतील असे आदेश निर्गमित केले. न्यायालयाने याचिकेतील कलम ५०(२), ३६ या कलमांपुरतीच आपल्या निर्णयाची व्याप्ती ठेऊन शासनाद्वारे उपायुक्त संवर्गातील मान्यताप्राप्त अधिकारी हे आयुक्त पदाकरिता पात्र ठरतील असे म्हटले आहे. पालिकेत दीर्घकाळ वरिष्ठ पदावर काम करूनही ज्यांना वरिष्ठ पदावरील बढतीची संधी मे २००६ च्या अध्यादेशामुळे मिळणार नव्हती ती त्रुटी न्यायालयाच्या निर्णयामुळे दूर झाली आहे.
उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली व राज्यातील इतर नवीन, जुन्या पालिकांमधील अनुभवी उपायुक्तांना आयुक्त व मोठय़ा पालिकांमधील आयुक्त नेमण्यात असणारी संदिग्धता न्यायालयाने दूर करून शासनाचा मार्ग मोकळा केला आहे.