News Flash

अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या तीन महिन्यात घरफोडीतील अनेक गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश मिळविले.

| July 24, 2013 09:30 am

स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या तीन महिन्यात घरफोडीतील अनेक गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश मिळविले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत डव्वा-गोपालटोली येथे पाच घरांची घरफोडी करण्यात आली होती. या घरफोडीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करून त्याच्याकडून २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज स्थानिक गुन्हे शाखेने केली. अटक झालेल्या आरोपींचे नाव विलास रूपचंद कुसराम (२६,रा. मुंडरीटोला-पळसगाव) असे आहे. या आरोपीला डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.
जिल्ह्य़ात मागील तीन महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. या तीन महिन्यात १० लाखांवर माल चोरटय़ांनी घरफोडी करून लंपास केला. मात्र, स्थानिक पोलिसांना चोरटय़ांना पकडण्यात सपशेल अपयश येत होते. घरफोडीच्या चोरांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झलके यांनी विशेष पथक तयार करून, तसेच स्थानिक गुन्हे शाखेला तत्पर करून चोरांना पकडण्याचा आदेश दिले. जिल्ह्य़ात घरफोडीचे गुन्हे वाढत आहेत.
घरफोडीतील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात येत नाही. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरांवर आळा घालण्याची जबाबदारी दिली. आज डुग्गीपार पोलीस ठाणा परिसरात गस्त घालत असताना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंडरीटोला-पळसगाव येथील विलास रूपचंद कुसराम याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने डव्वा येथे पाच घरफोडय़ा केल्याचे कबूल केले. त्याची कसून चौकशी केली असता १४ जुलच्या रात्री जयेंद्र धाडु साखरे व इतर पाच घरांची घरफोडी केल्याचे सांगितले, तसेच विलास कुसराम याच्याविरोधात नागपूर येथील पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या अट्टल गुन्हेगारांकडून घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे झुमके, चांदीची अंगठी, बॅनटेक्सची अंगठी, ८ मोबाईल, एक श्रवणयंत्र, असा एकूण २६ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीला डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सुधीर नवखरे, दिनेश पालांदूरकर, संतोष काळे, अण्णा ब्राम्हणकर, निशीकांत लोंदासे, दीक्षित, दमाहे, राधेश्याम गाते, जयप्रकाश शहारे, प्रभाकर पालांदूरकर, रेखलाल गौतम व चालक लांजेवार, सयाम यांनी केली. घटनेचा तपास डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर पर्वते करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 9:30 am

Web Title: expert criminal in police trap
Next Stories
1 अकोला मनपा स्थायी समिती निवडीची आज सुनावणी
2 फ्रेण्ड्स कॉलनीत भर दिवसा खाणावळ मालकावर गोळीबार
3 चार दिवसांमध्ये २० लाखांचे नुकसान एसटीला पावसाचा जबर फटका
Just Now!
X