News Flash

शेजारच्या राष्ट्रांचा अभ्यास असणारे तज्ज्ञ आवश्यक

शेजारच्या राष्ट्रांचा सर्वागीण अभ्यास असणारे विशेषज्ञ तयार करणे ही निकडीची बाब आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठामध्ये याविषयाची अभ्यासशाखा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेत कॉन्सुलेट

| April 12, 2013 01:14 am

 शेजारच्या राष्ट्रांचा सर्वागीण अभ्यास असणारे विशेषज्ञ तयार करणे ही निकडीची बाब आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठामध्ये याविषयाची अभ्यासशाखा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेत कॉन्सुलेट जनरल या पदावर नियुक्ती झालेले ज्ञानेश्वर मुळे यांनी गुरुवारी येथे वार्तालापप्रसंगी व्यक्त केले. आपण मालदीवचे गेली तीन वर्षे उच्चायुक्त असताना या देशाचा अभ्यास करण्यासाठी एकही भारतीय तेथे मला भेटला नाही, अशी पुस्तीही त्यांनी आपल्या विधानाच्या पुष्टय़र्थ जोडली.
मालदीव येथे बजावलेली कामगिरी व अमेरिकेतील जबाबदारी याविषयीचे विवेचन त्यांनी केले. ते म्हणाले, मालदीव हा भारताचा महत्त्वाचा शेजारचा देश आहे. शंभर टक्के साक्षर असलेल्या या देशाने निसर्गसंपन्नता सांभाळून वैभव उभे केले आहे. दक्षिण आशियाई देशात मालदीवचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. या देशामध्ये लोकशाहीचे बीजारोपण अलीकडेच झाले असून ती प्रस्थापित करणे हे खरे आव्हान आहे. संपन्न देशातील विषमता, इस्लाम व लोकशाही घटनेतील अंतर्विरोध यामुळे लोकशाही रुजण्यात अडचणी येत आहेत. तेथे संस्थात्मक बळकटी येणे लोकशाहीसाठी आवश्यक ठरले आहे.    
लोकशाहीमुळे सामान्य माणसांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. गेल्या चार वर्षांत चार राष्ट्राध्यक्ष झाले. यावरून तेथील राजकीय अस्थिरता लक्षात यावी, असा उल्लेख करून मुळे म्हणाले, मालदीव श्रीमंत असला तरी शासन व्यवस्था यथातथाच आहे. प्रागतिकता व परंपरागतता यांच्यातील विचारांची टक्कर येथे सुरू आहे. गेल्या दशकभरात कट्टरपंथीयांचा शिरकाव झाला असून अतिरेकी विचारांचा प्रसार गतीने होत आहे.    
आपली मायमराठी भाषा आणि मालदीवची विधेयी भाषा यांच्यामध्ये बरेचसे साधम्र्य आहे, असे नमूद करून मुळे म्हणाले, हिंदी, तामिळ, मराठी, मल्याळम आदी भारतीय भाषांचा मालदीवमध्ये प्रसार व्हावा, यासाठीही विशेष प्रयत्न केले. माझ्या हिंदी पुस्तकाचा केलेल्या अनुवादास मालदीवकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. या देशाशी भारताचे व्यापार, उद्योग, सांस्कृतिक, पर्यटनविषयक संबंध दृढ होण्याची गरज आहे.  
आपल्या अमेरिकेतील नव्या जबाबदारीविषयी मुळे म्हणाले, न्यूयॉर्क येथे कॉन्सुलेट जनरल या पदावर माझी नियुक्ती झाली आहे. तेथे एकूण सहा कॉन्सुलेट जनरल कार्यरत आहेत. अमेरिकेतील सिनेटर, महापालिका सदस्य आदींशी संवाद साधून तेथे चालणाऱ्या व्यापार, शिक्षण, सांस्कृतिक घडामोडींचा अहवाल भारताला पाठविणे ही आपली मुख्य जबाबदारी असणार आहे. अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा विकास, शैक्षणिक सहकार्य विकसित होण्यावर आपला भर राहणार आहे. अमेरिकेत ज्याप्रमाणे ‘थिंक टँक’ कार्यरत असतात या धर्तीवर भारतातही तसे कार्यरत व्हावे, असा आपला प्रयत्न राहणार आहे. या वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, हॉटेल टेरेस ग्रीलचे चालक प्रकाश माळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:14 am

Web Title: experts in study of neighbour nations are essential dnyaneshwar mule
Next Stories
1 लक्ष्मीबाई पाटील यांचे कार्य त्यागामुळे अजरामर- डॉ. भांजे
2 शिराळा आगाराकडून लांब पल्ल्याच्या एसटी बस
3 बंधाऱ्यावरील वीजपुरवठा एक तास सुरू करण्याचे आदेश
Just Now!
X